अनधिकृत इमारतींवर कारवाई टाळण्यासाठी व्हीआयपींचे फोन

ठाणे: कळवा प्रभाग समिती क्षेत्रातील कळवा, खारीगाव आणि विटावा भागातील अनधिकृत इमारतींमध्ये अधिकारी, पुढारी आणि प्रतिष्ठितांच्या सदनिका असल्याने कारवाई न करण्यासाठी त्यांचा दबाव पालिका अधिकाऱ्यांवर येत असल्याची चर्चा आहे.

कळवा प्रभागातील अनेक इमारती जुन्या आणि जीर्ण असून या इमारतींना क्लस्टर योजनेमुळे पुनर्बाधणीची परवानगी दिली जात नाही. ही संधी साधून कळव्यात काही ठिकाणी अनधिकृत इमारती उभ्या केल्या जात आहे. अवघ्या चार ते पाच महिन्यात उभ्या राहणाऱ्या या इमारतींवरही थातुरमातुर कारवाई केली जात असली तरी कळव्यातील काही इमारती अशा आहेत कि ज्यांच्यावर कारवाई करण्याची हिम्मत पालिका प्रशासनाकडून दाखवली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

काही दिवसांपूर्वीच कळव्यातील दोन इमारतींवर कारवाई करायला गेलेल्या पालिकेच्या अतिक्रमण पथकाला केवळ एकाच इमारतीवर कारवाई करता आली होती. दुसऱ्या इमारतीवरही कारवाई प्रस्तावित असताना या इमारतीमध्ये व्हीआयपीच्याही सदनिका असल्याचे उघड झाले. या इमारतींवर कारवाई करू नका, असे फोन पालिका अधिकाऱ्यांना येत असल्याने कारवाई होत नसल्याची माहिती पुढे येत आहे.