८५ हजारांची औषधे जप्त
ठाणे : कल्याण-भिवंडी रोड येथील आरव आय हॉस्पिटल येथे औषध विक्री करण्यास परवानगी नसतानाही आणि विक्री केल्यामुळे ठाणे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी कारवाई करत 85,325 रुपये किंमतीची 91 प्रकारची अॅलोपथीची औषधे जप्त केली आहेत.
काउंटरवर उपस्थित व्यक्तींकडे अॅलोपथी औषधे विक्रीसाठी औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व नियम 1945 अनुषंगे लागणा-या परवान्याबाबत विचारणा केली होती. त्यांच्याकडे तसे कोणतेही परवाने मंजूर नसल्याचे निष्पन्न झाले. काउंटरवर उपस्थित असलेल्या व्यक्तींनी प्रारंभीच ‘फार्मासिस्ट’ असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेकडून प्राप्त नोंदणीकरण प्रमाणपत्र सुद्धा असल्याचेही सांगितले,परंतु थोड्या वेळाने तो फार्मासिस्ट नसल्याचे व त्याच्याकडे असे कोणतेही प्रमाणपत्र नसल्याचे स्पष्ट झाले.
संबंधित दवाखाना हा डॉ.अश्विन बाफना यांच्या मालकीचा असून ते अवैधरित्या औषध विक्री करीत होते, हे उघडकीस आले.
संबंधित अॅलोपथी औषधे ही डॉक्टरांच्या चिठ्ठीद्वारे परवाना धारण करत असलेली औषध विक्री जुन्या दुकानातूनच विक्री करणे बंधनकारक आहे. त्यामुळे संबंधित दवाखान्याने औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन केले आहे. संबंधित कारवाई एफडीए प्रशासनामधील गुप्त वार्ता विभागाचे औषधे निरीक्षक वी.आर. रवी आणि शशिकांत यादव व औषध निरीक्षक (ठाणे)राजेश बनकर यांनी केली आहे. संबंधितांची कारवाई अन्न व औषध प्रशासनमधील आयुक्त अभिमन्यू काळे आणि सह आयुक्त (दक्षता) राहुल खाडे यांच्या निर्देशाच्या अनुषंगाने करण्यात आली आहे.
तसेच ठाणे येथील सह-आयुक्त नरेंद्र सुपे, सहाय्यक आयुक्त (गुप्तवार्ता मुंबई) उमाकांत बागमारे व ठाणे येथील सहाय्यक आयुक्त प्रकाश महानवर यांनी संबंधित धाड यशस्वी यासाठी प्रयत्न केले आहेत.