ठाणे: उच्च न्यायालयाचे निर्देश डावलून कोपरीमध्ये रहिवासी भागात फटाक्यांची विक्री करणाऱ्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात करण्यात आली आहे.
कोपरी बचाव समितीच्या वतीने ही याचिका याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली असून यामध्ये ठाणे महापालिकेला प्रतिवादी करण्यात आले आहे. ज्याप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्रेत्यांना खुल्या मैदानात फटाके विक्रीची परवानगी दिली जाते त्याच धर्तीवर रहिवासी भागात फटाक्यांची मोठमोठी दुकाने थाटून फटाक्यांची विक्री करणाऱ्या दुकानदारांनाही खुल्या मैदानात स्थलांतर करण्यात यावे अशी मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
फटाक्यांची विक्री रहिवासी भागात न ठेवता खुल्या मैदानात विक्री करावी असे उच्च न्यायालयाचे निर्देश असताना कोपरी परिसरात आजही न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करत फटाक्यांची विक्री रहिवासी भागात सुरु आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात या ठिकाणी अनधिकृत फटका विक्रेत्यांची दुकाने देखील वाढली असून रहिवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या या फटाके विक्रेत्यांवर अंकुश ठेवणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यासंदर्भात कोपरी बचाव समितीने उच्च न्यायालयच्या निर्देशाचा दाखल देत ठाणे महापालिकेला यापूर्वीच निवेदन दिले होते. या ठिकाणी रहिवासी भागात सुरु असलेल्या फटाके विक्रीवर कारवाई करण्याची मागणी समितीने ठाणे महापालिकेकडे निवेदनाच्या माध्यमातून केली होती.
दिवाळीचा सण तोंडावर असून यानिमित्ताने फटाक्यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. ठाण्यात फटाके खरेदीसाठी कोपरी परिसर प्रसिद्ध असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची दुकाने आहेत. यामध्ये काही जुनी तर काही नव्याने अनाधिकृत फटाके विक्री करणाऱ्या दुकानांची देखील भर पडली आहे. विस्फोटात्मक साठा रहिवासी भागात न ठेवता खुल्या मैदानात ठेवण्यात यावा असे निर्देश उच्च न्यायालयाचे आहेत. याच याचिकेचा दाखला देत याचिकाकर्ते हरेश सारवान यांनी ठाणे महापालिकेला पत्र दिले होते . यामध्ये अनेक दुकाने रहिवासी भागात असून फटाक्यांचा मोठ्या प्रमाणात साठा करणारे गोडावून देखील याच रहिवासी भागात असल्याचे सारवान यांचे म्हणणे आहे.
मात्र ठाणे महापालिकेच्या वतीने यावर कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नसल्याने अखेर रहिवासी भागात फटाके विक्रीच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून याप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्री करणाऱ्यांची व्यवस्था मैदानात करण्यात येते त्याप्रमाणे कोपरी मधील दुकानांचे देखील खुल्या मैदानात स्थलांतर करण्यात यावे अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे.