चार तारखेला जनता डीमोदीनेशन करणार

डोंबिवलीत उद्धव ठाकरे भाजपावर बरसले

कल्याण : मोदी सरकारने अचानकपणे चलनी नोटा बंद करून नोटांचे डिमॉनिटायझेशन केले त्याचप्रमाणे 4 तारखेला नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील, जनता डीमोदीनेशन करेल, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

कल्याण लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदानात प्रचार सभेचे आयोजन केले होते. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत शिवसेना नेते संजय राऊत आणि महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषाणात सांगितले की, भाजपा आता कांगावा करतेय की, शिवसेनेचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार आहे. ज्या भाजपाबरोबर २५ वर्षे काढली तेव्हा भाजपामध्ये नाही गेलो तर आता काय विलिनीकरण करणार आम्ही. हिंदूत्व सोडले अशी ओरड करायची आणि कर्नाटकमध्ये चंन्द्राबाबू नायडू जाहिरपणे अल्पसंख्याकांची री ओढतात ते चालते का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

गोहत्याबद्दल ओरड करायची मात्र मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होतात त्याबद्दल एक शब्दही काढत नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

मी चपराशी झालो तरी चालेल पण मी पुन्हा येईल, अशी देवेंद्र फडणवीसांची अवस्था आहे. महाराष्ट्र लुटला जातोय तरी मिंधे दिल्लीश्वरांची चाकरी करतात. तुम्हाला वचन दिले आहे, महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. महाराष्ट्राचे वैभव यांनी गुजरातला नेलं आहे. ते परत आणणार आहे. मोदींना महाराष्ट्राबद्दल कळवळा आलाय, असेही ठाकरे म्हणाले. ज्यांना मोठं केलं ते गद्दार झाले, पण कल्याणची ओळख गद्दारांना गाडणारी झाली पाहिजे, असं आवाहनही ठाकरेंनी केलं.