सत्तेतील मोठी पदे भूषविणार्‍यांनी प्रचार करु नये – लक्ष्मीनारायण

ठाणे : निवडणुका निरपेक्ष होण्यासाठी सत्ताकारणाातील मोठ्या पदांवर असणाार्‍या व्यक्तीेनी प्रचारात भाग घेता कामा नये. यामुळे मतदारांवर वेगळाच प्रभाव पडतो आणि सर्वदृष्टीने आदर्श अशा उमेदवाराच्या नशिबी पराभव येतो, ‘असे मत ठाण्याचे स्वेच्छा निवृत्ती घेतलेले पोलीस सह-आयुक्त लक्ष्मीनारायण यांनी व्यक्त केले.

देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली तर सर्वसामान्य माणसाला घटनेेने दिलेल्या हक्कांपासून वंचित ठेवणारी यंत्रणाच आपण निर्माण केली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
पाच वर्षांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतलेले श्री. लक्ष्मीनारायण एक निःस्पृह अधिकारी म्हणून ओळखले जात. खळबळ उडवून देणाऱ्या बांधकाम व्यावसायिक सुरज परमार आत्महत्या प्रकरणाचा तपास त्यांनी केला होता. त्यात चार नगरसेवकांना काही काळ तुरुंगात जावे लागले होते.
एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आलेल्या श्री. लक्ष्मीनारायण यांनी ‘ठाणेवैभव’ला मुलाखत दिली आणि लोकशाहीतील सर्वसामान्य माणसाच्या नशिबी उपेक्षा आणि अपेक्षाभंगच आल्याची परखड टिप्पणी केली.

स्वेच्छानिवृत्ती घेतल्याचा तुम्हाला कधी पश्चाताप झाला का? विशेषत: तुम्ही पोलिस आयुक्तही झाला असता.
लक्ष्मीनारायण: अजिबात नाही. मी खूप विचार करुन स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. किंबहुना सध्या जी अवस्था पोलिस खात्याची झाली आहे ती पहाता, मी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला असे वाटते.

प्रश्न  : ‘सिस्टिम’मध्ये राहून सुधारणा करण्याची संधी त्यामुळे गमावली असे नाही वाटले?
लक्ष्मीनारायण: नागरीक म्हणून मी नेहमीच सिस्टिममध्ये रहाणार आहे. घटनेने दिलेल्या हक्कांचा वापर करीत मी कर्तव्य बजावत राहू शकतोच की. तसे माझे काम सुरु आहे.

ज्या राजकीय क्षेत्रावर गंभीर आक्षेप घेतले जातात, त्यातच तुम्ही कसा काय प्रवेश केला?
लक्ष्मीनारायण: राजकारणाचा चांगला उपयोगही करता येऊ शकतो. राजकारणापासून कोणीच अलिप्त रहाता कामा नये. राजकारण हा लोकशाही पद्धतीचा अपरिहार्य भाग आहे आणि म्हणूनच या प्रक्रियेत सहभागी व्हायला हवे. राजकारणाकडे पूर्वग्रहदूषित दृष्टीकोनातून बघण्याऐवजी त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करुन घ्यायला हवा. चांगल्याचे प्रमाण वाढले तर अपप्रवृत्ती अल्पमतात जाईल.

राजकारण श्रीमंतांची मक्तेदारी बनली आहे. तिथे सर्वसामान्य माणसांची डाळ कशी शिजणार?
लक्ष्मीनारायण : सर्वसामान्य माणसाने स्वत:ला इतके दुर्बल मानता कामा नये. त्यांनी दुर्बळच रहावे यासाठी राजकारणी प्रयत्न करीत रहाणार. त्याला आव्हान देऊन जनतेने आवाज ऐकू जाईल इतकी शक्ती मिळवायला हवी. केवळ मतदानाचा हक्क बजावून ही ताकद येणार नाही, त्यासाठी राजकारणात सक्रीय सहभाग घ्यायला हवा. राजकारणातून पैशाचे उच्चाटन आदर्शवादाने होईल.

तुम्ही निवडणूक लढवली. तुमचा काय अनुभव होता?
लक्ष्मीनारायण : मी पोलिस सेवेतून निवृत्ती घेतल्यावर विशाखापट्टणम येथून लोकसभेची निवडणूक लढवली. माझ्यासमोर प्रस्थापित पक्षांचे उमेदवार होते. मी जनसेनेतर्फे निवडणूक लढवली आणि १५ दिवसांच्या प्रचारात २.८८ लाख मते मिळवली. तेव्हा माझ्या लक्षात आले की निवडणूक आयोगाने निवडणुकीत होणारा खर्च आणि अन्य अनिष्ठ बाबींकडे बारीक लक्ष ठेवले तर सर्वसामान्य उमेदवारही बाजी मारु शकतो. आमच्या ‘जॉईन फॉर डेव्हलपमेंट फाउंडेशन’तर्फे आम्ही आयोगाकडे तसेच सर्वोच्च न्यायालयात निवडणूक नियमावलीत सुधारणांचा मसुदा सादर करणार आहोत. सध्या दोषी उमेदवारांना फक्त सहा वर्षांसाठी मज्जाव करणे हेतू साध्य करीत नाही.

त्यातील काही प्रमुख बाबी सांगाल काय?
लक्ष्मीनारायण : राजकारणातील गुन्हेगारीकरणावर अंकुश ठेवण्यासाठी उमेदवाराविरुद्ध आरोपपत्र दाखल होताच त्याला मज्जाव करण्यात यावा, तो दोषी ठरला तर त्याला आजन्म निवडणूक लढवण्यास प्रतिबंध करावा, निवडणूक खर्चावर काटेकोर पाळत ठेवावी, हिशेब नीट तपासले जावेत, मतदानाची सक्ती करावी अशा सुचना या मसुद्यात आहेत. सध्या दोषी उमेदवारांना फक्त सहा वर्षांसाठी मज्जाव करणे हेतू साध्य करीत नाही.

निवडणूक एका दिवसांत घेण्यासही आपला आक्षेप आहे?
लक्ष्मीनारायण : होय. मतदानाची ऑनलाईन व्यवस्था करावी आणि प्रत्येक मतदारास युजर-पासवर्ड दयावा. त्याला पाहिजे तेव्हा तो १५ दिवसांत केव्हाही मतदान करु शकेल. विजयी आणि उपविजयी उमेदवारांमध्ये अंतिम निवडणूक व्हावी. यामुळे व्होट-बँकेचे राजकारण, मते विकत घेण्याची प्रथा वगैरे यास आळा बसेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवडणुकीबाबतचे खटले विशेष न्यायालयात सुनावणीस घेऊन निकालात काढण्याची कारवाईची तजवीज करावी. न्यायालयात प्रकरणे, मग ती भ्रष्टाचाराची असोत की निवडणूक गैरप्रकाराची, खूप काळ प्रलंबित राहिल्याने निवडणुकीचा पुरता फज्जा उडत आहे. कोणालाच धाक राहिलेला नाही. आम्ही अशीही एक सूचना केली आहे की निकालातील विजयी आणि उपविजयी उमेदवारांना पुन्हा रिंगणात उभे करुन अंतिम विजयी उमेदवार ठरवावा. एका दिवसात निवडणुका घेउन प्रस्थापित मंडळी आपला डाव साधत असतात.

लोकसहभाग वाढवण्यासाठी नागरी आघाडीसारखे प्रयोग किती यशस्वी ठरतील?
लक्ष्मीनारायण : जनसहभाग असेल तरच पुढारी लोकशाहीशी छेडछाड करणार नाहीत. म्हणूनच नागरी आघाडीसारखे उपक्रम यशस्वी होणार नाहीत याचा बंदोबस्त प्रस्थापित नेतेमंडळी करीत असतात. यासाठी जनतेने उदासिनता झटकायला हवी. राजकारणावर चर्चा आणि मतदान यापलिकडे जात भूमिका बजवायला हवी. आमच्या फाउंडेशनतर्फे आंध्रप्रदेश आणि तेलंगणात हे काम सुरु आहे.