विद्यार्थ्यांची गुणपत्रिका रोखणाऱ्या कॉलेजला दंड

मनसेच्या पाठपुराव्यामुळे चार वर्षांनी न्याय

ठाणे : गेल्या चार वर्षांपासून गुणपत्रिकेसाठी वंचित असलेल्या दोघा विद्यार्थ्यांना अखेर मनसेमुळे न्याय मिळाला असून ठाण्यातील इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड कंप्यूटर स्टडीज (आयएमसीओएसटी) कॉलेजला याबद्दल मुंबई विद्यापीठाने एक लाख १० हजारांचा दंड ठोठावला आहे.

तीन महिन्यांपूर्वी मनविसेचे राज्य सरचिटणीस संदीप पाचंगे यांच्याकडे विद्यार्थ्यांची तक्रार आली होती. याचा मनसेने पाठपुरावा केल्यामुळे अखेर या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठाण्यातील आयएमसीओएसटी संस्थेतून चार वर्षांपूर्वी कृतिका राठोड आणि मलायेल बवाचन या विद्यार्थ्यांनी टीवायबीएमएसची परीक्षा देऊनही गुणपत्रिका न मिळाल्याने मनसेकडे तक्रार केली होती. गुणपत्रिका न मिळाल्यामुळे गेल्या चार वर्षांपासून हे विद्यार्थी नोकरीपासून वंचित होते.

याबाबत चौकशी केली असता कॉलेज आणि विद्यापीठामध्ये असलेल्या सुसंवादातील अंतर, कॉलेजकडून झालेली चुका याचा फटका या विद्यार्थ्यांना बसला होता. याप्रश्नी मुंबई विद्यापीठाशी पाठपुरावा करून संस्थेने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून तत्काळ गुणपत्रिका द्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही देण्यात आला होता. अखेर विद्यापीठाने कॉलेजच्या चुकांबद्दल दंड आकारत विद्यार्थ्यांना न्याय दिला आहे.

मुंबई विद्यापीठाने इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड कंप्यूटर स्टडीज (आयएमसीओएसटी) कॉलेजला दिलेल्या पत्रामध्ये विद्यार्थी जुन्या वार्षिक अभ्यासक्रमाचा असल्यामुळे विद्यापीठ ठरावानुसार कॉलेजने विद्यापीठाची पूर्व परवानगी न घेता या विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमात प्रवेशित केल्यामुळे प्रत्येकी ३० हजार तसेच परीक्षेस प्रविष्ठ केल्यामुळे २५ हजार असा एकूण एका विद्यार्थ्यांसाठी ५५ हजारांचा दंड आकरण्यात आला होता. दोन्ही विद्यार्थ्यांसाठी एक लाख १० हजारांचा दंड कॉलेजला ठोठावला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

चार वर्षे गुणपत्रिका न मिळाल्यामुळे मनविसेकडे विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती. विद्यापीठाची परवानगी न घेता चुकीचे मार्गदर्शन करून नवीन अभ्यासक्रम निवडायला भाग पाडले. या मनमानी कारभारासाठी कॅालेजला ठोठावलेला एक लाख १० हजार रूपये दंड भरल्यामुळे आता गुणपत्रिका मिळणार आहे. गुणपत्रिका नसल्यामुळे कुठेही नोकरी मिळाली नाही यासाठी सर्वस्वी जबाबदार कॅालेज आहे. त्यामुळे मुलांना नुकसान भरपाई म्हणून गेल्या चार वर्षाचा पगार कॅालेजने दिला पाहिजे, अशी मागणी संदीप पाचंगे यांनी केली आहे.