रिक्षाचालकांच्या संपामुळे ठाण्यात प्रवाशांचे हाल
ठाणे: वाहतूक विभागाकडून आकारण्यात येणाऱ्या भरमसाठ दंडाविरोधात ठाणे शहरातील शेअर रिक्षा चालकांनी सोमवारी संप पुकारल्यामुळे शेअर रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. रिक्षा थांब्यांवर रिक्षा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागले. तर इतरवेळी शेअर रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसचा आधार घ्यावा लागला. परिणामी टीएमटी आणि खाजगी बसेसमध्ये गर्दी झाली होती.
ठाणे शहरात ज्यादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या तसेच बेशिस्तपणे रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांवर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या रिक्षा चालकांकडून १५०० रुपये दंड आकारला जात आहे. दररोज मिळत असलेल्या उत्पन्नातून अर्धी रक्कम दंडापोटी खर्च होत असल्यामुळे अनेक रिक्षाचालक त्रासले आहेत. दंड स्वरुपात आकारण्यात येणारी रक्कम पूर्वीसारखी कमी करण्याची मागणी त्यांच्याकडून जोर धरु लागली आहे. जर मागणी पूर्ण झाली नाही तर, ५ ऑगस्टपासून बेमुदत रिक्षा संप पुकारला जाईल, असा इशारा काही शेअर रिक्षा चालकांनी दिला होता.
या पार्श्वभूमीवर शहरातील रिक्षा संघटनांनी रविवारी खासदार नरेश म्हस्के यांची भेट घेतली. यावेळी संप पुकारलेले काही रिक्षाचालक उपस्थित होते. या बैठकीत रिक्षा चालकांची समजूत काढण्यात आली आणि रिक्षा चालकांनीही संप मागे घेतल्याचे जाहीर केले होते.
सोमवारी शेअर रिक्षा चालकांनी संप पुकारल्यामुळे शहरातील विविध भागातील शेअर रिक्षा थांब्यांवर सोमवारी रिक्षा उपलब्ध नव्हत्या. रिक्षा नसल्यामुळे थांब्यावर प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. काही प्रवाशांनी टीएमटी बसने प्रवास करण्याचे ठरविल्यामुळे बस थांब्यावरही प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. या रिक्षा चालकांच्या संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
शहरातील वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, यशोधन नगर, किसननगर, अंबिका नगर, कामगार रुग्णालय अशा विविध भागातील शेअर रिक्षा थांब्यांवर रिक्षा नसल्याचे दिसून आले. ऑटोमॅटिकजवळ असलेल्या शेअर रिक्षा थांब्यावर रिक्षा चालक रिक्षासह उभे होते. परंतु, त्यांनी रिक्षा बंदचा मोठा फलक त्या ठिकाणी ठेवला होता. ते कोणतेही प्रवासी भाडे स्विकारत नसल्याचे दिसून आले.
वागळे इस्टेट परिसरात मोठ्या संख्येने औद्योगिक कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये ठाणे शहरासह इतर शहारातील नागरिक नोकरीसाठी येतात. स्थानक परिसरातील बी कॅबिन भागातून वागळे इस्टेट येथे येण्यासाठी शेअर रिक्षा स्टँड आहे. संपामुळे या थांब्यावर एकही रिक्षा नसल्याचे दिसून आले. वागळे इस्टेट भागात जाणाऱ्या प्रवाशांनी रिक्षाच्या शोधात बी कॅबीन परिसराच्या चौकात गर्दी केली होती.
संपामुळे प्रवाशांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन काही लोकप्रतिनिधींना वाहतूक पोलीस नियंत्रण विभागात सोमवारी दुपारच्या सुमारास धाव घेतली. यावेळी शहरातील शेअर रिक्षाचालकांनी मोठ्या संख्येने वाहतूक विभागाबाहेर गर्दी करत त्या ठिकाणी घोषणाबाजी केली. यावेळी लोक प्रतिनिधींनी वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांची भेट घेतली आणि रिक्षा चालकांचे म्हणणे त्यांच्या समोर मांडले.
वागळे इस्टेटमधील शेअर रिक्षाचालकांनी विविध मागण्यांसाठी अचानक संप पुकारल्यामुळे बी-केबिन येथून कामावर निघालेल्या आयटी कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल झाले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या विनंतीनंतर टीएमटी प्रशासनाने ३७ जादा बस सोडल्यामुळे कर्मचाऱ्यांची सोय झाली. त्याबद्दल आयटी कर्मचाऱ्यांकडून संजय वाघुले यांचे आभार मानण्यात आले.
बेशिस्त रिक्षाचालकांवर जी दंडात्मक कारवाई केली आहे ती कायदेशीर आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापासून लोकआदालत प्रक्रिया पुन्हा सुरु होणार आहे. त्यात, रिक्षा चालकांचा दंड जास्तीत जास्त कमी करण्याचे निवेदन आम्ही न्यायालयाला देणार आहोत, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी दिली.