पुलावर तरुणीचा मोबाईल खेचून धमकावले
ठाणे : घोडबंदर येथील आर माॅलजवळील पादचारी पुलावरून रस्ता ओलांडत असताना एका तरूणीचा मोबाईल खेचून तिला धमकावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यापूर्वीही या पुलासमवेत अन्य पादचारी पुलांवरही असे प्रकार घडले असल्याने या पादचारी पुलांवरील सुरक्षितता धोक्यात आली आहे.
दिवा येथे राहणारी २६ वर्षीय मुलगी घोडबंदर येथील मानपाडा भागात कामाला आहे. सुमारे महिन्याभरापूर्वी तिने २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल खरेदी केला होता. रविवारी तरूणी कामानिमित्ताने मानपाडा येथे आली होती. रात्री ८ वाजता घरी जाण्यासाठी ती रस्ता ओलांडण्यासाठी आर माॅल येथील पादचारी पूलावर आली. त्याचवेळी एक तरूण तिच्या मागून आला. त्याने तरूणीच्या हातातील मोबाईल खेचला. तसेच तरूणीला खाली पाडले. त्यानंतर त्या चोरट्याने तरूणीला पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. चोरटा काही अंतरावर गेला असता तरूणीने आरडाओरड केली. त्यावेळी विनायक कुडेकर, राहुल राठोड आणि आनंद गुप्ता या तिघांनी त्या चोरट्याला पकडले. त्याला पोलीस ठाण्यात आणले असता त्याने त्याचे नाव आतिष धीवर असल्याची माहिती दिली.
याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी धीवर याला ताब्यात घेतले आहे. या पादचारी पूलावर ऑगस्ट २०२२ मध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला होता. पोलिसांनी याप्रकरणातील आरोपीला अटक केली होती.
वागळे इस्टेट येथील रोड क्र. १६ वरील जुन्या पासपोर्ट ऑफिससमोर महापालिकेने पादचारी पूल उभारला होता. मात्र, या पुलाचा नागरिकांकडून वापर केला जात नाही. त्याचा गर्दुल्ले, मद्यपींकडून वापर होत असल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. आजही काही पादचारी पुलांवर दारूच्या रिकाम्या बाटल्या, कचरा ल, आणि गर्दुल्यांचा वावर असतो. पुलांची दररोज साफसफाईही केली जात नाही. अशा कारणांमुळे रात्री पादचारी पुलाचा वापर करणे महिला टाळतात. बऱ्याच वेळा या पुलावर दिवाबत्ती देखील सुरु नसते, त्यामुळे या घटनेनंतर या ठिकाणी आता सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.