फेरीवाला कमिटी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

ठाणे: मागील अनेक वर्षे कागदावर असलेल्या फेरीवाला धोरणातील कमिटीच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे.

११ एप्रिल रोजी निवडणुकीसाठी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. या निवडणुकीनंतर फेरीवाला धोरणाची कमिटी अंतिम होऊन फेरीवाला धोरण लागू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

२०१९ मध्ये ठाणे महापालिकेने जो सर्व्हे केला त्या सर्व्हेच्या आधारे ठाणे शहरात केवळ सहा हजार फेरीवाल्यांचा सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये केवळ दोन हजार फेरीवाल्यांनी आपले पुरावे प्रशासनाकडे जमा केले असल्याचा दावा त्यावेळी प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आला होता. दरम्यान आता फेरीवाला धोरण अंतिम करतांना फेरीवाल्यांची संख्या १३६५ एवढी निश्चित झाली आहे. सध्या ३० जणांची कमिटी फेरीवाल्यांची आहे. मात्र आता नव्याने कमिटी तयार होणार असून त्यात २० जणांचा समावेश असणार आहे.

आता या नव्या कमिटीची निवडणुक येत्या ११ एप्रिल रोजी होणार आहे. ठाणे महापालिकेने आता कमिटीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे. २६ मार्च रोजी मतदान केंद्र निहाय मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यानंतर २७ आणि २८ मार्च रोजी सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत ठाणे महापालिका मुख्यालय, तळ मजला येथे नामनिर्देशन पत्राचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर १ आणि २ एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्र स्विकारले जाणार आहे. ३ एप्रिल रोजी अर्जांची छाननी केली जाणार असून ४ तारखेला आक्षेप अर्ज स्विकारले जाणार आहेत. त्यानंतर ७ एप्रिल रोजी आक्षेप अर्जावर सुनावणी घेतली जाणार आहे. ८ तारखेला नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा कालावधी असणार असून दुपारी ३ पर्यंत त्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे. माघारी नंतरची अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे.

त्यानंतर ११ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी ५ वाजेपर्यंत मतदान करावे लागणार आहे. प्रभाग समिती कार्यालयात मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यानंतर ५ वाजतानंतर महापालिका मुख्यालयात मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.