ठाणे: कर्णधार माही ठक्करच्या अष्टपैलू खेळामुळे पय्याडे स्पोर्ट्स क्लबने भारत क्रिकेट क्लबचा तीन विकेट्सनी पराभव करत डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित पाचव्या अर्जुन मढवी स्मृती महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. भारत क्रिकेट क्लबचे १८३ धावांचे आव्हान पय्याडे क्रिकेट क्लबने सात फलंदाजांच्या मोबदल्यात ३१.५ षटकात १८४ धावासह पार केले.
यष्टीरक्षक आणि सलामीवीर धनश्री वाघमारे, कर्णधार केतकी धुरेने भारत क्रिकेट क्लबच्या धावसंख्येला आकार दिला. केतकीने ५३ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर धनश्रीने ३८ आणि श्रुतिका पाटीलने २२ धावा केल्या. दिशा लोटेने तीन, क्रितीका यादवने दोन, माही ठक्कर, जिया मांदरवडकर आणि रिद्धी कोटेचाने प्रत्येकी एक बळी मिळवला.
माफक आव्हानाचा पाठलाग करताना पय्याडे स्पोर्ट्स क्लबची अडखळत सुरुवात झाली. सुरुवातीच्या पडझडीनंतर कर्णधार माही ठक्करने सूत्रं आपल्या हाती घेत प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर हल्ला बोल केला. माहिने ४२ चेंडूत १२ चौकार आणि तीन षटकार ठोकत ७६ धावा करत संघाला विजयाचा दरवाजा उघडून दिला. ललिता यादवने २६ आणि आश्लेषा बरारने नाबाद २१ धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. लक्ष्मी सरोजने पाच बळी मिळवत प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत आणले होते. ती या आवृत्तीतील एकाच डावात पाच विकेट घेणारी पहिली गोलंदाज बनली. तसेच साक्षी गुरवने दोन बळी मिळवले.
संक्षिप्त धावफलक: भारत क्रिकेट क्लब ३७.५ षटकात सर्वबाद १८३ (धनश्री वाघमारे ३८; दिशा लोटे ३/२८) पराभूत विरुद्ध पय्याडे स्पोर्ट्स क्लब ३१.५ षटकात ७ बाद १८४ (माही ठक्कर ७६; लक्ष्मी सरोज ५/६९)
सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू – माही ठक्कर (पय्याडे स्पोर्ट्स क्लब).