ठाणे: ठाणेकर नागरीकांच्या ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करातील सामान्य कर माफ झाला आहे. तर अन्य करदात्यांनी मालमत्ता कर १५ जूनपर्यंत भरल्यास सामान्य करात १० टक्के सुट देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी देखील सुरु केली आहे.
महापालिका हद्दीत पाच लाख ६० हजार करदाते आहेत. त्यानुसार आता ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करातील सामान्य कर माफ करण्यात आल्याने मालमत्ता कर बिले वितरण करण्यासाठी उशिर झाला होता. परंतु आता येत्या दोन दिवसात याचे नियोजन आखले जाणार असून पुढील आठवड्यापासून बिलांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती मालमत्ता कर विभागाने दिली. दुसरीकडे आता मालमत्ता कराची वसुली निर्धारीत वेळेत व्हावी आणि नागरीकांनी देखील मालमत्ता कर वेळेत भरावा या उद्देशाने पालिकेने पावले उचलली आहेत. त्यानुसार २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकालीत पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत, दुस:या सहामाहीचा कर अशी संपूर्ण रक्कम भरल्यास अशा करदात्यांना त्यांच्या दुस:या सहामाहीच्या सामान्य करात सुट देण्यात येत असल्याची माहिती पालिकेने दिली.
त्यानुसार १५ जूनपर्यंत रक्कम भरल्यास १० टक्के सुट दिली जाणार आहे. तर १६ जून ते ३० जून या कालावधीत या रकमेचा भरणा केल्यास ४ टक्के, १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत भरल्यास ३ टक्के आणि १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत भरल्यास २ टक्के सवलत दिली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने दिली आहे.