जाती-जमाती आरक्षणाचा पेच; उमेदवारीसाठी होणार रस्सीखेच

अनुसूचित जातीसाठी १० तर जमातीसाठी तीन प्रभाग राखीव

ठाणे: ठाणे महापालिका निवडणुकीकरिता अनुसूचित जातीच्या आणि जमातीकरिता राखीव असलेले प्रभाग निवडणूक आयोगाने जाहिर केले असून खारटन रोड-चेंदणी कोळीवाडा या एका प्रभागात दोन जागा अनुसूचित जाती आणि जमातीकरिता राखीव झाल्याने उर्वरित एका जागेकरिता मोठी रस्सीखेच पाहण्यास मिळणार आहे

राज्य निवडणूक आयोगाने ठाणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना १४ मे रोजी जाहीर केली आहे. तीन सदस्य असलेल्या १४२ नगरसेवकांचे ४७ प्रभाग असलेला आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. काल लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीकरिता दहा आणि अनुसूचित जमातीसाठी तीन प्रभाग जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार अनुसूचित जातीकरीता प्रभाग क्रमांक ३ ब्रह्मांड, कोलशेत, आझादनगर, प्रभाग क्रमांक १० वर्तकनगर, लक्ष्मीनगर, प्रभाग क्रमांक १२ शास्त्रीनगर, परेरानगर, प्रभाग क्रमांक १५ अंबिकानगर, ज्ञानेश्वर नगर, प्रभाग क्रमांक २३ सी. पी. तलाव, इंदिरा नगर, प्रभाग क्रमांक २४ श्रीनगर, शांतीनगर, रामनगर, प्रभाग क्रमांक २७ आनंदनगर, गांधीनगर कशीश पार्क, प्रभाग क्रमांक २९ खारटनरोड, चेंदणी कोळीवाडा, प्रभाग क्रमांक ३४ मनीषा नगर, जानकीनगर आणि प्रभाग क्रमांक ४४ दातीवली-बेतवडे तर प्रभाग क्रमांक ५ कोकणी पाडा निलकंठ, प्रभाग क्र. ६ येऊर, शिवाईनगर आणि प्रभाग क्रमांक २९ खारटन रोड, चेंदणी कोळीवाडा हे प्रभाग अनुसूचित जमातीकरिता राखीव झाले आहेत.

प्रभाग क्रमांक २९ हा अनुसूचित जाती आणि जमातीकरिता आरक्षित झाला आहे. दोन जागा राखीव झाल्याने एक जागा खुल्या वर्गाकरिता शिल्लक राहिली आहे, त्यामुळे एका जागेकरिता या प्रभागात उमेदवारी मिळविण्यासाठी चढाओढ लागणार आहे. एकाच प्रभागात दोन आरक्षण टाकता येत नसल्याबद्दल महापालिकेच्या निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले या प्रभागामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांची संख्या जास्त असल्याने निवडणूक आयोगाने तेथे दोन्ही जागा राखीव ठेवल्याचे सांगितले. ३१ मे रोजी डॉ.काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे सोडत होणार आहे.

प्रभाग क्रमांक १५, ३ आणि २७ या प्रभागात पहिल्यांदाच एक जागा राखीव झाली आहे, त्यामुळे विद्यमान नगरसेवकांना एका जागेकरिता समझोता करावा लागणार आहे, त्यामुळे उमेदवारी मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.