रेल्वेतून खाडीत पडणाऱ्या प्रवाशांचा आधार निसटला !

जीवरक्षक राजेश खारकर याचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

ठाणे : धावत्या लोकलमधून विटावा खाडीत पडणाऱ्या तीन हजारांहून जास्त प्रवाशांना जीवदान देणारा विटावा येथील संवेदनशील मनाचा जीवरक्षक राजेश खारकर याचे काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आता खाडीत रात्री-अपरात्री पडलेल्या आणि उड्या घेतलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी कोण धावून येणार, अशा भावना पोलीस, अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापनाकडून व्यक्त होत आहेत.

जणू दैवी देणगी प्राप्त असलेला राजेश विटावा खाडीकिनारी कुटुंबासमवेत राहायचा. विटावा खाडीत गेल्या अनेक वर्षात हजारो लोक पडून बुडून मेले आहेत. रेल्वेमधून खाडीत पडलेल्याचा आवाज एखाद्या दैवी देणगीसारखा राजेश याच्या कानावर अचूक पडायचा. धो धो पावसातही त्याला हे आवाज स्पष्ट यायचे आणि कशाचीही तमा न बाळगता रात्री-बेरात्री तो पुराच्या पाण्यातही बेभानपणे खाडीत उडी मारून जीव वाचवायचा.

अनेकदा पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन शोध मोहिमेसाठी राजेशला रात्री अपरात्री फोन करायचे. हातातील काम टाकून राजेश त्यांच्या हाकेला ओ देत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपली होडी खाडीत न्यायचा. विशेष म्हणजे अनेकवेळा त्याने स्वखर्चाने वाचवलेल्या नागरिकांना रुग्णालयातून नेल्याची माहिती विटाव्यातील नागरीकांनी दिली.

रेल्वेतून खाडीत पडलेले किंवा जीवनाला कंटाळलेले नागरिक आत्महत्या करण्याच्या उद्देशाने खाडीत उड्या मारायचे. त्यावेळी त्यांच्या अंगावर किमती वस्तू असण्याच्या शक्यता असत. पण राजेशने कधीच त्या वस्तूंना हात लावल्याचे ऐकिवात नाही. उलट पुढील कार्यवाहीसाठी तो पदरमोड करत असे, अशी माहितीही काही रहिवाशांनी दिली.

महिन्यातून दोन-चारदा त्याचा फोन त्याच्या पत्रकार मित्रांना आल्यावाचून राहत नसे. एखाद्याचा जीव वाचवल्याची घटना तो सांगायचा त्यावेळी त्याला खूप आनंद व्हायचा. महिन्याभरात त्याचा कधी फोन आला नाही तर त्याचा एखादा पत्रकार मित्रच त्याला आवर्जून फोन करून त्याची ख्याली खुशाली विचारत असे.

अनेक जीव वाचवलेल्या राजेशला वाचवण्यात मात्र नातेवाईकांना अपयश आले. त्याला आलेला हृदयविकाराचा झटका एवढा तीव्र होता की दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या निधनाने परिसरात, सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे.