ठाणे : मुंब्र्यातील रेतीबंदर परिसरातील डोंगरावर असलेल्या घरातील मागच्या बाजूची जमीन खचल्याने घराचा मागील भाग कोसळल्याची घटना शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.
ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन घरात राहणाऱ्या सहा जणांना शेजारच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित केले आहे.
मुंब्रा रेतीबंदर परिसरातील ठाणे महापालिका शाळा क्रमांक 93 जवळील राणानगरमध्ये राहणाऱ्या दगडु भांगरे यांच्या घराच्या मागील बाजूस अंदाजे 10 बाय 6 फूट जमीन खचल्याने घराची मागील भिंत शेजारच्या नाल्यात कोसळली. त्यामुळे घराचा उर्वरीत भाग धोकादायक झाल्याने घर रिकामे करून घरात राहणाऱ्या सहा जणांना सुरक्षिततेच्या दृष्टीने शेजारच्या नातेवाईकांकडे स्थलांतरित करण्यात आले आहे.