पारसिक बोगदा धोकादायक; दुकानांना तडे, रस्तेही खचले

संरक्षक भिंतीसाठी खोदकाम सुरू असताना घडली घटना

ठाणे : पारसिक बोगद्याजवळ डोंगरालगत संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यासाठी खोदकाम करत असताना जवळच्या २५ दुकानांच्या भिंतींना तडे गेले तर बाहेरील काँक्रीट रस्ताही खचला. या घटनेने व्यापार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी ठामपा आपत्ती व्यवस्थापनाने धाव घेत सदर परिसर सील करण्यात आला.

ठामपा आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास पारसिक बोगद्याजवळ वाघोबा नगर, कळवा (पु.) येथे रेल्वेच्या संरक्षण भिंतीचे नव्याने बांधकाम करण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. त्यामुळे डोंगरालगत असलेला रस्ता खचला असून, जवळच असलेल्या काही दुकानांच्या भिंतीनाही तडे गेले आहेत. सदर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी एक पिकअप वाहनासह, कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर, रेल्वे प्रशासनाचे संबंधित वरिष्ठ अभियंता व ठेकेदार उपस्थित झाले. या घटनेत कोणालाही दुखापत नाही. मात्र दुकानांचे गाळे धोकादायक स्थितीत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ते सील करण्यात आले.

छत्तीलाल विश्वकर्मा, कल्लू राम लाहोर, सुनिता यादव, विमला लाहोर, संजय शर्मा, भेरुनालाल प्रजापति, बजरंग चौहान, नरेश जैसवार, अजय नागर, डॉ. सुभाष यादव, राजेंद्र शर्मा, सुनील अग्याहरी, अक्रम शेख, राजेश सिंग, नरेश कुमावत, शक्तिराम विश्वकर्मा, बुरसिंग खरवार, अब्दुल कलाम, प्रेम शंकर मौर्या, जगदीश मौर्या, रिता मौर्या, पारसनाथ यादव, हिरेंद्र यादव,राम विश्वकर्मा, राम फेर यादव अशी दुकान मालकांची नावे आहेत.