मनोरमानगरमध्ये भटक्या कुत्र्याची दहशत

चार बालकांना घेतला चावा

ठाणे : मनोरमानगरमधील अशोकनगर येथे भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट ही सध्या नागरिकांसाठी चिंतेची समस्या झाली असून येथे वावरणार्‍या एका कुत्र्याने आतापर्यंत चार बालकांना चावा घेतल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

मनोरमानगरमध्ये येणारे अशोक नगर हे बैठ्या चाळीचे ठिकाण आहे. साहजिकच येथे लोकांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. लहान मुले घराच्या बाहेर खेळताना दिसतात तर प्रौढ व्यक्ती ओट्यावर बसलेले असतात. त्यातच या ठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. हे कुत्रे येणार्‍या जाणार्‍या लोकांवर भुंकत राहतात. तर काहीवेळा नागरिकांची हातातील पिशवी घेऊन पळून जातात. याच कुत्र्यांच्या टोळीतील एक कुत्रा गेल्या काही महिन्यांपासून पिसाळलेला असून तो लहान मुलांना आपले लक्ष्य करत आहे. आतापर्यंत या कुत्र्याने चार बालकांना चावा घेतला आहे. हा कधी कुठूनही येतो आणि अचानक नागरिकांवर हल्ला करतो. साहजिकच अशोकनगरमधील नागरिकांमध्ये या कुत्र्याची दहशतीने भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत येथील जनविकास वेलफेअर सोसायटीमार्फत महापालिकेकडे दोन वेळा तक्रार देऊनही आतापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. एक महिन्यापूर्वी महापालिकेचे कर्मचारी या कुत्र्याला घेऊन गेले होते मात्र काही दिवसातच तो कुत्रा पुन्हा या ठिकाणी आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पालिकेच्या संबंधित विभागाने ताबडतोब या गंभीर समस्येची दखल घेऊन या कुत्र्याचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. हा कुत्रा या परिसरात राहिला तर अजून किती लोकांना चावेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे येथील नागरिक घराबाहेर पडण्यासही धजावत नाहीत.