पांडू-महादूच्या जोडीने १० दिवसांत जमवला पाच कोटींचा गल्ला!

ठाणे : लॉकडाऊननंतर सिनेमागृहे खुली झाल्यानंतर मराठी चित्रपटांचं भवितव्य काय असेल, मोठ्या बॅनर्सच्या हिंदी चित्रपटांपुढे यांचा टिकाव लागेल का हिंदीमुळे मराठीला हव्या तशा स्क्रिन्स आणि शोज मिळतील का असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. पण या सर्वच प्रश्नांना अतिशय सकारात्मक आणि सणसणीत उत्तर दिलं आहे झी स्टुडिओजच्या ‘पांडू’ चित्रपटाने. दहा दिवसांतच तब्बल पाच कोटींची कमाई ‘पांडू’ने केली आहे.

गेली दीड वर्षे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मात्र सगळीच परिस्थिती बदलली. चित्रपट प्रदर्शनासाठी अनेक नियम आणि निर्बंध आले. या सगळ्याचा सामना मराठी चित्रपट कसा करेल असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला होता. याच वातावरणात झी स्टुडिओजने आपला ‘पांडू’ हा सिनेमा प्रदर्शित केला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांनी पहिल्या दिवसापासूनच भरभरून प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांपासून गावागावांतही अनेक ठिकाणी पांडूने हाउसफुल्लचे बोर्ड झळकवले.

भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या जोडगोळीचा अफलातून अभिनय सोबतीला सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळीसारख्या गुणी अभिनेत्रीच्या कसदार भूमिका, प्रविण तरडे, आनंद इंगळेसारखे कसलेले सहकलाकार, थिरकायला लावणारं संगीत आणि विजू माने यांचं कौशल्यपूर्ण दिग्दर्शन, या सगळ्या दिग्गजांच्या योगदानामुळे ‘पांडू’सारखी दर्जेदार कलाकृती तयार झाली.