हजारो कामगारांचे भवितव्य टांगणीला!
ठाणे : शहरातील सर्वात जुन्या पनामा ब्लेड कंपनीतील सुमारे सहा हजार कामगारांवर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर कंपनी अग्निसुरक्षेची काळजी घेत नसल्याने भोपाळसारखी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विद्युत मेटॅलिक्स लिमिटेड (पनामा) ही कंपनी तीन हात नाका येथे असून तिचे नवीन नाव सुपरमॅक्स असे आहे. या कंपनीचे माजी उपाध्यक्ष सुभाष चौधरी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही धक्कादायक माहिती दिली. ही कंपनी सध्या ज्या व्यवस्थापनाच्या हातात आहे त्यांनी कंपनी जणू तोट्यात घालवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असा आरोप श्री. चौधरी यांनी केला. कर्मचार्यांना वेळेवर वेतन दिले जात नाही. त्यापोटी सुमारे 25 कोटी देणी थकली आहेत. तर या कंपनीवर अवलंबून असलेल्या छोट्या कंपन्यांची 50 कोटी थकीत देयके देणे बाकी असल्याचे श्री. चौधरी यांनी सांगितले.
या कंपनीने तयार केलेले ब्लेड विकले जात नसल्याचे कारण देऊन उत्पादन कमी करण्यात आले आहे. परदेशात मात्र येथे उत्पादन केलेल्या मालाची दुसर्या कंपनीमार्फत विक्री केली जात आहे. कंपनी तोट्यात असल्याचे भासवून बँकेच्या कर्जाचे हप्ते देखील फेडले जात नाहीत, असा आरोप श्री. चौधरी यांनी केला, त्यामुळे बँकांनी देखील कर्ज वसुलीची प्रक्रिया सुरू केली आहे.या कंपनीच्या ब्लेडचा दर्जा घसरला जावा या करिता ब्लेड तयार करण्याची प्रक्रिया कमी करण्यात आली आहे. या कंपनीवर सुमारे 600 कोटींची विविध संस्थांची देणी आहेत. त्या जोरावर ही कंपनी आजारी असल्याचे भासवून कंपनी बंद करण्याचा डाव आहे. त्यामुळे कामगारांना कोणत्याही प्रकारची देणी मिळणार नाहीत आणि जिलेट या स्पर्धेतील कंपनीला जगावर राज्य करता येईल असेही श्री. चौधरी म्हणाले. या कंपनीमध्ये अमोनिया विभाग आहे. तेथे कोणत्याही प्रकारची अग्निसुरक्षेची काळजी घेतली जात नाही. या विभागात अमोनिया गळती झाली तर ठाण्याचे देखील भोपाळ होऊ शकते, अशी भीती व्यक्त करून ठाणे महापालिका प्रशासनाकडे अनेकदा निवेदने देऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई महापालिकेच्या अग्निशमन विभागाने केली नाही, असा आरोप देखील त्यांनी केला.
ही स्वदेशी कंपनी आहे. ती बंद पडता कामा नये. या कंपनीतील सुमारे सहा हजार कामगार आणि कंपनीवर अवलंबून असलेले इतर सात ते आठ हजार अशा 15 हजार कामगारांवर उपासमारीची पाळी येऊ नये, या हेतूनेच पत्रकार परिषद घेतली आहे, असे श्री. चौधरी म्हणाले. ठाण्यातील राजकीय नेत्यांनी तसेच राज्य आणि केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घालावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.