भाईंदर: पालघर जिल्हा माहिती अधिकारीपदी अर्चना शंभरकर यांची जिल्हा माहिती अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सोमवारी ‘माहिती अधिकारी’ पालघरचा पदभार स्वीकारला.
अर्चना शंभरकर यांनी यापूर्वी मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या जनसंपर्क अधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मंत्रालय मुंबईत वरिष्ठ सहायक संचालक म्हणून कार्यरत होत्या. उद्योगमंत्री, महसूल मंत्री, आदिवासी विकास मंत्री, गृहनिर्माण, कृषी, शालेय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, मराठी भाषा अशा अनेक विभागांसाठी त्यांनी विभागीय संपर्क अधिकारी म्हणून काम केले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात माहितीपट शाखेचे प्रमुख, महान्यूज शाखेचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे. 2019 मधील लोकसभा-विधानसभा निवडणुकीदरम्यान मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात विधानसभा निवडणुकांसाठी मीडिया समन्वयक म्हणून काम केले. गुजरातमधील भूकंप आणि दंगलीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली त्यांची ‘सोलमेट’ ही कादंबरी प्रकाशित झाली असून हिंदी आणि मराठीत असे दोन कादंबरी प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत.