पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; भारताने अनेक ड्रोन पाडले

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणाव वाढला असून पाकिस्तानने जम्मूवर ड्रोन हल्ला केला आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर पूर्ण जम्मूमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले असून भारताची डिफेन्स सिस्टिम सक्रिय झाली आहे. भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोन पाडल्याची माहिती समोर आली आहे. जम्मूतील विमानतळ हे पाकिस्तानचे लक्ष्य होतं अशी माहिती समोर येत आहे.

गुरुवारी रात्रीच्या वेळी भारताच्या हद्दीतील जम्मू शहरात पाकिस्तानच्या ड्रोनचा हल्ला सुरू झाला. त्यानंतर जम्मूमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले आणि सायरन वाजवून लोकांना सावध करण्यात आलं. त्यानंतर या प्रदेशाचा ताबा लष्कराने घेतला. दरम्यान, भारताची डिफेन्स सिस्टिम एस 400 सक्रिय झाली आणि त्या माध्यमातून भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोनला हवेतच लक्ष्य केलं.

पाकिस्तानच्या दहशतवादाला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आणि नऊ ठिकाणी हल्ला करून दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. त्यानंतर गुरुवारी सकाळी पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन सीमाभागात गोळीबार केला. तसेच भारताच्या 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

पाकिस्तानच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने लाहोरमध्ये ड्रोन घुसवून त्यांची एअर डिफेन्स सिस्टिम निकामी केली. त्यामुळे पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली. परिणामी पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. तरीही पाकिस्तानने आता पुन्हा आगळीक केली आणि जम्मूवर ड्रोन हल्ला केला.

पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारताची एस 400 ही डिफेन्स सिस्टिम सक्रिय झाली असून त्याने पाकिस्तानचे अनेक ड्रोन हवेतच नष्ट केले. जम्मूमध्ये नेमके किती ड्रोन आले याची नेमकी माहिती समोर आली नाही. पण भारताकडून ते सर्व ड्रोन पाडण्याची कारवाई सुरू आहे.

जम्मूतील विमानतळ हे पाकिस्तानचे लक्ष्य होतं अशी माहिती समोर आली आहे. जम्मूच्या विमानतळाच्या दिशेने जवळपास आठ ड्रोन येत होते. पण ते सर्वच ड्रोन हवेतच पाडण्यास भारताला यस आलं आहे.

जम्मूनंतर राजस्थानच्या सीमावर्ती भागातही ब्कॅकआऊट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व सीमावर्ती भागात भारतीय लष्कर सक्रिय झालं आहे.