जिल्ह्यात ५५ हजार हेक्टरवर होणार भाताची लागवड

१० हजार मेट्रिक टन खतांचा साठा मंजूर

ठाणे : जिल्हा परिषद कृषि विभागाकडून खरीप हंगामाचे नियोजन करण्यासाठी बियाची मागणी करण्यात आली असून नियंत्रण कक्ष, तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती, भरारी पथकांची स्थापना करून शेतकरी बांधवांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.

ठाणे जिल्ह्यात खरीप हंगामाखालील सरासरी क्षेत्र 60 हजार हेक्टर एवढे असून त्यापैकी भात पिकाखालील सरासरी क्षेत्र 56 हजार हेक्टर आहे. मागील खरीप हंगामामध्ये 53,742 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची पेरणी झाली होती. यावर्षी 55 हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवडीचे नियोजन आहे. त्यासाठी कृषि विभागाने शासनाकडे 11,110 मे.टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली होती. शासनाने ठाणे जिल्ह्यासाठी 10 हजार मेट्रिक टन खतांचा साठा मंजूर करून दिला आहे. त्यापैकी 7,900 मेट्रिक टन युरीया खताचा वाटा आहे. शेतकऱ्यांकडून युरीया खतांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

त्याचप्रमाणे जिल्ह्यांसाठी एकूण 22 हजार क्विंटल भात बियाण्यांची गरज असून 45टक्के बियाणे बदल गृहित धरुन 9,900 क्विंटल भात बियाण्यांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. त्यापैकी 2,200 क्विंटल महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडील बियाणे असून 7,700 क्विंटल बियाणे खाजगी बियाणे उत्पादक कंपन्या पुरविणार आहेत. उर्वरित 12,100 क्विंटल भात बियाणे शेतकरी स्वत:कडील वापरणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांनी दिली.