ठाण्यात गोवरचा फैलाव; २४ तास ओपीडी सुरू

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत गोवर बाधित बालकांची संख्या ५४ वर पोहचली असून मुंब्रा भागात गोवरने चांगलेच हातपाय पसरले आहेत. महापालिकेची चिंता वाढली असून पालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये २४ तास ओपीडी सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

गोवरची साथ ठाणे जिल्ह्यात वाढत असून सर्वाधिक रुग्ण भिंवडी आणि आता ठाणे महापालिका हद्दीत आढळून येत आहेत. लसीकरणासंदर्भात गैरसमज असल्यामुळे मुस्लिमबहूल भागामध्ये गोवरचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यात ठाण्यात गोवरने बालिकेचा बळी घेतल्यानंतर पालिका प्रशासन अलर्ट मोडवर आली असून खुद्द आयुक्त अभिजित बांगर यांनी परिस्थिती नियंत्रणात आण्यासाठी ठोस पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. लसीकरण वाढवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्यासाठी त्यांनी खास मुंब्रा येथील कौसा रुग्णालयात शनिवारी सर्व आरोग्य यंत्रणांसोबत बैठक घेतली. या बैठकीस, उपायुक्त मनीष जोशी, वैद्यकीय अधीक्षक अनिरुद्ध माळगावकर, नागरी आरोग्य केंद्र समन्वयक डॉ. राणी शिंदे, मुंब्रा विभागातील आरोग्य अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ठाणे पालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत ५४ गोवरबाधित बालके आढळली आहेत. गुरुवारी ही संख्या ५० इतकी होती. गोवरचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे एकट्या मुंब्रा परिसरातील आहेत. ही बाब जरी गंभीर असली तरी गोवर या आजाराबाबत नागरिकांनी  घाबरुन जाण्याची गरज नाही, असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे. सर्व आरोगय केंद्रामध्ये २४ तास ओपीडी सुरू ठेवून वैद्यकीय तपासणीसाठी आरोग्य अधिकारीही तीन पाळ्यांमध्ये उपलब्ध असतील अशा पध्दतीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी सर्व वैद्यकीय आरोग्य अधिकार्‍यांना दिल्या आहेत. दरम्यान मुंब्रा येथील चारही आरोग्य केंद्रामध्ये २४ तास रुग्ण्वाहिका तयार ठेवण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

पार्किंग प्लाझात ३२ तर कळवा रुग्णालयात १३ रुग्ण

कोविड काळात वरदान ठरलेले ठाण्याच्या पार्किंग प्लाझा येथील केंद्र आता गोवर बाधितांवर उपचार करत आहे. या रुग्णालयात सध्याच्या घडीला ३२ बालकांवर उपचार सुरू आहेत तर पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १३ रुग्ण दाखल आहेत.