जिल्हा शल्य चिकित्सकांची हाडाची डॉक्टरकी

पायाचे हाड मिळूनही डॉ.कैलाश पवार बजावतात कर्तव्य

ठाणे : पायाचे हाड मोडून झालेल्या दुखापतीमुळे दोन महिने आराम करण्याचा सल्ला दिला असतानाही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार दर दिवशी रुग्णालयांमध्ये येऊन दैनंदिन कामकाजाची माहिती घेतात. कर्मचारी आणि अधिका-यांच्या समस्या आणि रुग्णांच्या अडचणी सोडवण्याचे कर्तव्य बजावत आहेत.
सिव्हिल रुग्णालयाचे स्थलांतर करण्यापासून, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधकामाठिकाणी रात्रीचा दिवस करुन ते काम करताना दिसले. जून महिन्याच्या तिस-या आठवड्यात डॉ. पवार रुग्णांच्या तब्येतीची माहिती घेण्यासाठी व दैनंदिन कामाचा आढावा घेत होते. मात्र चालताना पाय अडखळून मुरगळल्याने पायाला सूज आली व दुखू लागला. सूज कमी होत नसल्यामुळे एक्सरे काढला असता उजव्या पायाच्या पोटरीचे लहान हाड तुटल्याचे निदर्शनास आले. त्वरीत पायाला प्लास्टर घातले आणि दोन महिने घरी सक्तीची विश्रांती देण्याचा सल्ला दिला. मात्र दोन-तीन दिवस घरी आराम करून पायाची काळजी घेत डॉ. पवार सिव्हिलमध्ये येऊन दैनंदिन कामकाजाची माहिती घेतात, अशी माहिती अस्थिव्यंग तज्ञ डॉ. विलास साळवे यांनी दिली.

नव्या स्थलांतरित सिव्हिलमध्ये रुजू होणा-या रुग्णांना चांगले उपचार मिळालेच पाहिजेत हा त्यांचा कटाक्ष आहे. दीड महिन्यानंतर प्लास्टर काढले आहेत. अंतर्गत जखम अजून भरलेली नाही. रुग्णालयातील रुग्णांची आणि स्वत:च्या दुख-या पायाची योग्य ती काळजी घेत आहेत. अवघ्या दोन महिन्यांमध्ये सिव्हिल रुग्णालय कार्यरत झाले असले तरीही काही तांत्रिक अडचणी आहेत. मात्र त्या मी आणि माझे सहकारी सोबत असल्यावर मार्गी लागतील, असे त्यांचे म्हणणे आहे.

वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना दैनंदिन अडचणी येतात. त्यांना व अनेक रुग्णांना मोठी वैद्यकीय मदत लागली की तो सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, असे डॉ. साळवे यांनी सांगितले.

भर पावसात पोहचले समृद्धी मार्गावर
शहापूर समृद्धी मार्गावर गर्डर पडून दुर्घटना घडली. त्यावेळीदेखील सिव्हिल रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकांसह रुग्णवाहिका घेऊन पायाला प्लास्टर असूनही मध्यरात्री भरपावसात डॉ. कैलास पवार पोहचले. अपघातग्रस्तांनाही त्यांंनी मदत केली होती, अशी माहिती अस्थी व्यंग तज्ज्ञ डॉ. साळवे यांनी दिली.