ठाणे : मागील काही दिवस ठाण्यात पाऊस बरसत असून गुरुवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह अति मुसळधार पाऊस ठाण्यात पडणार असल्याने हवामान खात्याने ठाण्याला ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.
मागील १० ते १२ दिवस ठाण्यात पाऊस पडत आहे. मागील आठवड्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला होता. आठवडाभर दुपारनंतर पावसाचा जोर चढत आहे. अनंत चतुर्थीच्या दिवस देखिल पावसाने ठाण्याला झोडपून काढले होते. अवघ्या तीन तासात ७८ मिमी इतका पाऊस ठाण्यात झाला होता. शहरातील अनेक सखल भागात पाणी तुंबले होते. चार वर्षाच्या मुलासह दोन जण वाहून गेले होते तर एका महिलेच्या अंगावर झाड पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. पाऊस विश्रांती घेईल अशी ठाणेकरांना अपेक्षा होती, परंतु आज हवामान खात्याने पुढील पाच दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामध्ये गुरुवारी अति मुसळधार पाऊस पडणार असल्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.