लोकसभा निवडणुकीनंतर विरोधक होणार बेकार

* नमो महा रोजगार मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचा टोला
* मेळाव्यात सहा हजार तरुणांना तत्काळ नोकऱ्या

ठाणे: मुखी रामनाम आणि प्रत्येक हाताला काम देणारे हे सरकार आहे. आज ३० हजार तरुणांनी नमो महारोजगार मेळाव्याला हजेरी लावली असून सहा हजार तरुणांना तत्काळ नोकरी देण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले तर लोकसभा निवडणुकीनंतर विरोधक बेकार होणार असल्याचा टोलाही त्यांनी हाणला.

वागळे इस्टेट येथिल मॉडेल मिल कम्पाउंड येथे नमो महारोजगार मेळाव्याचे कौशल्य विकास विभागातर्फे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी विभाग स्तरावर असे मेळावे घेतले जात आहेत. तरुणांना जागेवरच नोकरी दिली जाते, त्यामुळे तरुणांमध्ये उत्साह आहे. मोठ्या प्रमाणावर तरुण येथे आले आहेत. सुमारे ३५० कंपन्या, त्यांचे मालक आणि एचआर स्टाफ तरुणांना नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करत आहे. राज्य सरकारने एक लाख तरुणांना नोकऱ्या दिल्या आहेत तसेच एक लाख स्वयंरोजगाराची निर्मिती केली आहे. दावोस येथे राज्य सरकारने तीन लाख ७३ हजार कोटींचे करार केले आहेत. त्यामधून देखिल रोजगार निर्मिती होणार आहे. हे सरकार काम करणारे आहे, त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे. त्यांच्याकरिता आपला दवाखाना देखिल उघडला असल्याचा टोला मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी लगावला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीनंतर विरोधक बेकार होणार आहेत. त्यांना काहीच काम राहणार नाही. मुंह में राम और बगल में छुरी अशी विरोधकांची नीति असल्याची टीका मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली.
हे सरकार विकास करणार आहे. ठाण्यात काही महिन्यानंतर मेट्रो धावणार आहे. समृद्धी मार्गाची निर्मिती केली आहे. अनेक विकासाची कामे आम्ही केली असल्याचे श्री. शिंदे म्हणाले.

यावेळी कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. प्रताप सरनाईक, आ.किसान कथोरे, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के आदी उपस्थित होते.