बदलापूर: आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे व इतरांचे संरक्षण कसे करावे, याचे प्रात्यक्षिक आज बदलापूरकरांसमोर सादर करण्यात आले. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश याद्वारे देण्यात आला.
केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्जता तपासण्यासाठी ऑपरेशन अभ्यास या मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी चारच्या सुमारास बदलापूर पूर्वेकडील सुरवळ चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात हे मॉक ड्रिल झाले.
पेहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या युद्धाचे ढग जमले आहेत. जर युद्ध आणखीन भडकले तर नागरिकांनी कसे सज्ज रहावे याचे प्रात्यक्षिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि नागरिक संरक्षण दलाच्या वतीन बदलापूरकरांना देण्यात आले. यात युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास लॉन्ग सायरन आणि शॉर्ट सायरन्स या दोन सायरनच्या माध्यमातून काय संदेश दिला जातो. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास किंवा मिसाईल हल्ला अथवा इतर कोणत्याही माध्यमातून हल्ला झाल्यास जखमींना, किंवा एखाद्या ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना सुरक्षीत स्थळी कसे हलवावे, याचे प्रात्यक्षिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दलाने प्रात्यक्षिकांतून दाखवले. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यास ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि नागरिक संरक्षण दल सुसज्ज असल्याचा संदेश या निमित्ताने प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून देण्यात आला. या प्रात्यक्षिकात कुळगांव बदलापूर अग्निशमन दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, नागरिक संरक्षण दल यासह एमआयडीसी फायर ब्रिगेड व ॲम्बुलन्स आणि बदलापूर नगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या प्रात्यक्षिकात सहभागी झाले होते. बदलापूरकरांनीही या प्रात्यक्षिकात सहभागी होऊन युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास बचावासाठी काय काय उपाययोजना कराव्यात याची माहिती घेतली.
उल्हासनगरचे उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी, जिल्हा नागरिक संरक्षण दलाचे उपनियंत्रक विजय जाधव यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी यावेळेस प्रत्यक्ष उपस्थित होते. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शासनाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे व नागरिकांनी शासनाला मदत करण्याचा आव्हान यावेळेस अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांनी केले.
आमदार किसन कथोरे, माजी नगराध्यक्ष राम पातकर, राजेंद्र घोरपडे आदींसह कुळगाव बदलापूर नगर परिषदेतील अनेक माजी नगरसेवकही यावेळी उपस्थित होते.