कल्याण : केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्यासाठी ‘ऑपरेशन अभ्यास’ या मॉक ड्रिलचे आयोजन कल्याण पश्चिमेतील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणावर करण्यात आले होते. केंद्रीय गृह विभागाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून यशस्वीरित्या ही मॉक ड्रिल पार पडली.
यावेळी कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरातील एकूण चार सायरन एकाच वेळी वाजले. बॉम्ब हल्ल्याची सूचना मिळाली. सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या. धावाधाव, गडबड न करता नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविले. या परिसरात शोध मोहीम घेऊन जखमी, अडकलेल्या नागरिकांची तत्काळ सुटका करणे, त्यांना प्रथमोपचार करणे, ही कार्यवाही करण्यात आली.
यावेळी जिल्हा प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, कल्याण तहसिलदार, नागरी संरक्षण दल, केडीएमसी आयुक्त, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, पोलीस यंत्रणांचे अधिकारी आणि आमदार तसेच राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सर्वसामान्य नागरिकांनी हे मॉकड्रील पाहण्यासाठी गर्दी केली होती. तर हे मॉकड्रील सुरु असतांना अचानक आलेल्या पावसाने सगळ्यांची चांगलीच धांदल उडाली. पावसापासून बचावासाठी अनेकांनी ग्राउंडबाहेर जात दुकानांच्या आडोशाचा आधार घेतला. तर काहींनी चक्क मैदानातील स्टेजखाली जात आपला बचाव केला.