ठाणे : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महिला आरक्षण सोडत पार पडली. पालिकेने हरकती सुचना मागविल्यानंतर अवघ्या तीन हरकती पालिकेला प्राप्त झाल्या असून या तीनही हरकती पालिकेने निकालात काढल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रभागांची आरक्षण सोडत ३१ मे रोजी काढण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेने आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी महिलांसाठी राखीव आरक्षण सोडत जाहिर केली. त्यानंतर या बाबत कोणाला काही हरकती अथवा सुचना असतील तर त्यांनी ६ जूनपर्यंत त्या सादर कराव्यात असेही पालिकेने स्पष्ट केले होते. त्यानुसार पालिकेकडे या दिवसात तीन हरकती आल्या. यामध्ये आरक्षण सोडतीवर हरकत घेण्याऐवजी प्रभागांच्या रचनेवर हरकती घेतली आहे. त्यामुळे ही हरकत फेटाळण्यात आली. तर दुसरी हरकत प्रभाग क्रमांक १५ च्या बाबतीत घेण्यात आली. यामध्ये प्रभागाच्या लोकसंख्येवरुन हरकत घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. तर अशाच स्वरुपाची हरकत इतर एका प्रभागावर घेण्यात आली. मात्र या तीनही हरकतींवर पालिकेकडून उत्तरे देण्यात आली आहेत.