* मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन
शहापूर : शहापूर तालुक्याची पाणी टंचाई निवारणासाठी भावली पाणी योजना यशस्वी करणार, त्यात कोणीही कितीही अडथळा आणला तरी योजना पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आश्वासित केले.
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाणे जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा योजनांच्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पडघा, वासिंद, आसनगाव, चेरपोली, खर्डी येथे भेट देऊन पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात पोहचून तेथील महिलांची पाण्यासाठी होणारी धडपड राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या नजरेने पाहिले आहे.त्यामुळे भावली पाणी योजना ही एकनाथ शिंदे यांचे प्राण असून त्यासाठी योजनेला पूर्णत्वाकडे नेणारच.गुरुवारी शहापूर तालुक्यातील जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन संदर्भात ग्रामपंचायत भेटी दौऱ्यावर असताना गुलाबराव पाटील यांनी माध्यमांना सांगितले.
भावली पाणी योजनेच्या माध्यमातून शहापूर तालुक्यातील २९८ गाव पाड्यांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेमुळे पाणीटंचाई दूर होऊन तालुका सुजलाम् सुफलाम् अर्थात पाणीदार होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी राज्य सरकारने ३०० कोटींहून अधिक निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र इगतपुरी तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी शहापूरला भावली धरणाचे पाणी न देण्याचा उठाव केल्याने अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे भावली योजनेचलचे पाणी मिळण्याबाबत तालुक्यातील टंचाईग्रस्त भागातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शहापूर तालुका दौऱ्यावर आलेले गुलाबराव पाटील यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी या पाणी टंचाईचे भयाण वास्तव कथन केले. यावेळी आमदार शांताराम मोरे, शिवसेना नेते प्रकाश पाटील, ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे, जिल्हा परिषद जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक प्रमोद काळे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता तन्मय कांबळे, शिवसेना जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे, तालुकाप्रमुख प्रकाश वेखंडे आदी अधिकारी उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत १०४७ कामे सुरु आहेत. त्यापैकी ७२० नळ पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण असून ३२७ कामे, घरगुती नळजोडणीची आहेत. यामध्ये शहापूर तालुक्यातील सात कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. याबाबत वनविभागाचे वाईल्ड लाईफची परवानगीची चार कामे प्रलंबित आहेत. तर दोन कामे जागेच्या अंतर्गत वादामुळे प्रलंबित तर एक ठिकाणी रस्ता नसल्याने तेथे जाण्याची सुविधा नसल्याने प्रलंबित आहेत. त्याचप्रमाणे जल जीवन मिशन अंतर्गत सुरु करण्यात आलेली परंतु सध्या बंद असलेली ५१ कामे आहेत. त्यासंदर्भात कार्यवाही सुरू असून उर्वरित कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
माळ पठार, कसारा विभाग, शिरोळ-अजनुप विभाग, वाशाळा विभाग, तलवाडा पठार, साकडबाव पठार, डोळखांब विभाग, टाकीपठार, खर्डी आणि बिरवाडी या भागात फेब्रुवारी-मार्च महिन्यांत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई सुरू होते. पाण्याची धरणे खाली आणि गाव उंच पठारावर असल्याने लिफ्ट पाणी योजना यशस्वी होत नाही. या भागातील पाणीटंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून भावली योजनेला मंजुरी मिळाली. या योजनेला अनेक अडथळे आले मात्र ते पार करून या योजनेच्या कामाला गती येत असल्याचे दिसत आहे.
ठाणे जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित कराव्यात, संबंधित अधिकाऱ्यांनी तसेच कंत्राटदारांनी नेमून दिलेली कामे गांभीर्यपूर्वक लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशा अत्यंत कठोर शब्दात सूचना मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या. शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई हा येथील माय भगिनींच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे कोणीही कितीही अडथळा आणला तरी ही भावली योजना पूर्ण होणारच. येथील महिलांच्या डोक्यावर हंडा पाहिल्यावर एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात पाणी येते. त्यामुळे ही योजना होणार यात तिळमात्र शंका नाही, असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी दिला.
भावली धरण दीड हजार दशलक्ष घनफूट साठवण क्षमतेचे आहे. हे धरण ५९० मीटर उंचीवर आहे. शहापूर भागातील गावे आणि पाडे २२० ते ५४० मीटर इतक्या उंचीवर असल्याने भावली धरणातून गुरुत्वाकर्षणाने या गावांना पाणी मिळू शकते.यासाठी एक युनिटही वीज खर्च करण्याची आवश्यकता नाही.