आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यात विशिष्ट पक्षाच्या माजी नगरसेवकांनाच निमंत्रण

नम्रता कोळींची आयुक्तांकडेच तक्रार

ठाणे : महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचा शहरातील पाहणी दौरा पुन्हा वादात सापडला आहे. प्रभाग क्रमांक २२ मधील पाहणीच्या दौऱ्यावेळी विशिष्ट पक्षाच्या दोघा माजी नगरसेवकांनाच निमंत्रित करण्यात आले. तर एका पक्षाचा विभागप्रमुखही दौऱ्यात सहभागी झाला होता. या प्रकारावर भाजपाच्या माजी नगरसेविका नम्रता कोळी यांनी आयुक्तांकडेच तक्रार केली आहे. तसेच या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.

महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांच्याकडून प्रभाग क्रमांक २२ मधील बाजारपेठ, खारटन रोड विभागाची आज सकाळी पाहणी करण्यात आली. प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपाचे दोन व शिवसेनेचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. या दौऱ्याचे केवळ भाजपाच्या माजी नगरसेवकांना निमंत्रण देण्यात आले नव्हते, याबद्दल नम्रता कोळी यांनी नाराजी व्यक्त केली.

सध्या महापालिकांच्या निवडणुका ओबीसी मुद्द्यावरून पुढे ढकलल्यामुळे प्रशासकीय राजवट लागू आहे. मात्र, आम्ही माजी नगरसेवक म्हणून जनतेच्या संपर्कात राहून कार्य करीत आहोत. तसेच जनतेच्या समस्यांविषयी एक सजग नागरिक म्हणून महापालिकेकडे पाठपुरावा करीत आहोत. अशा परिस्थितीत प्रभाग दौऱ्याच्यावेळी केवळ भाजपाच्याच नगरसेवकांना कसे डावलले गेले. प्रभाग क्र. २२ मधून प्रतिनिधीत्व केलेले एका विशिष्ट राजकीय पक्षाचे दोन्ही माजी नगरसेवक व एका पक्षाचा विभागप्रमुख नेमके कसे उपस्थित होते, असा सवाल नम्रता कोळी यांनी केला आहे.

या प्रकारावरून महापालिका प्रशासनाचा दुजाभाव व भाजपाला सापत्नभावाची वागणूक मिळत आहे. या दौऱ्याबाबत संबंधित नेते-कार्यकर्त्यांनाच माहिती कशी मिळाली. त्यातून विरोधी पक्षाच्या नेत्यांनाच का वगळले गेले, हा प्रश्न निर्माण होत आहे. या प्रकरणी आपण गंभीर दखल घेऊन संबंधित माजी नगरसेवकांनाच निमंत्रित करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी नम्रता कोळी यांनी केली आहे.