कौसा रुग्णालयात कर्करोग कक्ष उभारणीच्या कामाला वेग
ठाणे : यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्यानंतर कौसा रुग्णालयात कर्करोग कक्ष उभारणीच्या कामाला वेग आला असून यासाठी वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्याची प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे. मात्र या सुविधा मिळण्यासाठी आचारसंहिता संपण्याची वाट ठाणेकरांना पाहावी लागणार आहे.
तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी नुकताच सादर केलेल्या अर्थसंकल्पात आरोग्य आणि स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये काही महत्वाच्या घोषणा देखील करण्यात आल्या आहेत. कौसा येथील 150 खाटांचे स्वांतत्र्यसैनिक हकीम अजमल खान हे रुग्णालय महापालिकेमार्फत पी.पी.पी. तत्वावर चालविण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून संबंधित कंत्राटदारास कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. या रुग्णालयामध्ये सर्व प्रकारच्या स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी सेवा रुग्णांना दिल्या जाणार आहेत. या रुग्णालयामध्ये महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत पिवळे व केशरी शिधापत्रिका धारण करणाऱ्या रुग्णांना मोफत आरोग्य सेवा पुरविली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये अपात्र ठरणा-या रुग्णांच्या उपचारापोटी येणारा खर्च महापालिकेमार्फत अदा केला जाणार आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयात कर्करोगग्रस्त रुग्णांना आरोग्य सेवा व उपचार मोफत देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यामध्ये स्क्रीनिंग टेस्ट-बायोस्पी, एमआरआय, पेट सिटी स्कॅन, रेडिएशन, सर्जरी अशा सुविधा मोफत देण्यात येणार आहेत. कर्करोगाचे उपचार मोफत उपलब्ध करुन देणारी ठाणे महापालिका ही भारतातील पहिली महानगरपालिका ठरणार आहे.
या सुविधा पीपी तत्वावर दिल्या जाणार असल्याने संबंधित ठेकेदाराकडून या अनुषंगाने कामाला देखील सुरुवात करण्यात आली आहे. कर्करोगासाठी रुग्णालयात वेगळा कक्ष निर्माण करण्यात येत असून वैद्यकीय उपकरणे खरेदीची प्रक्रिया देखील राबवण्यात येत आहे. प्रत्यक्षात या सुविधा सुरु होण्यासाठी थोडा कालावधी जाणार असून आचारसंहिता संपल्यानंतर मात्र या सुविधा सुरु होतील असा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.