ठाण्यात कोरोनाचे अवघे ३९ रुग्ण सक्रिय

ठाणे : शहरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या किंचित वाढली आहे. आज सहा रुग्णांची भर पडली आहे तर सक्रिय रुगणांची संख्या ५०च्या आत आली आहे. सुदैवाने आज एकही रूग्ण दगावला नाही.

महापालिका हद्दीतील माजिवडे मानपाडा आणि कळवा प्रभाग समिती क्षेत्रात सर्वाधिक प्रत्येकी दोन रूग्ण वाढले आहेत. प्रत्येकी एका रुग्णाची भर वर्तकनगर आणि लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती परिसरात पडली आहे. उर्वरित पाच प्रभाग समिती भागात एकही रूग्ण सापडला नाही.

विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी १०जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१,४७२ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी अवघ्या ३९जणांवर उपचार सुरू आहेत. आज एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत २,१२७जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील ३७९ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये सहा जण बाधित मिळाले आहेत. आत्तापर्यंत २३ लाख ९४,६७९ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८३,६३८जण बाधित सापडले आहेत.