ठाण्यासह राज्यातील शिधावाटप ऑनलाईन यंत्रणा ऑफ

ठाणे : ठाण्यासह महाराष्ट्रातील रेशनकार्ड व्यवस्थेच्या ‘रिमोट कंट्रोल आणि मॉनिटरिंग सिस्टम’मध्ये दररोज काहीनाकाही दोष निर्माण होऊन, गेल्या पाच महिन्यांपासून ही ‘ऑनलाईन’ यंत्रणा संपूर्णपणे बिघडली आहे. त्याचा फटका मुख्यत: राज्यातील अत्यंत गरीबांना बसला. त्यांना स्वस्त धान्य मिळणे अवघड झाले असल्यामुळे ते हवालदिल झाले आहेत. त्याचा ताण ‘खिडकी’ यंत्रणेवर पडला असल्यामुळे रेशनसंबंधी पारंपारिक दैनंदिन व्यवस्थाही कोलमडण्याच्या मार्गावर आहे.

गेल्या १ जानेवारीपासून ते १३ जूनपर्यंत ही ‘आरसीएमएस’ प्रणाली वापरताना संगणकावर ‘एरर’ येत असल्याने, असंख्य वापरकर्ते कमालीचे वैतागले आहेत. ही यंत्रणा बिघडल्यानंतर ‘ऑनलाईन फिडींग’ थांबल्यामुळे नवीन रेशनकार्ड घेतलेल्या आणि कार्डात नव्याने नावे जोडलेल्या नागरिकांनाही स्वस्त धान्य मिळणे कठीण झाले. नवे रेशनकार्ड काढल्यानंतर त्यातील संबंधित माहिती अद्ययावत होते. तत्पूर्वी, कुटुंबप्रमुखाने प्रत्येक सदस्याचे आधारकार्ड जोडल्यावर त्याला १२ अंकी क्रमांक मिळतो. त्यानंतरच पात्र कुटुंबाला स्वस्त धान्य मिळते. तर काही रेशन कार्यालयांत या सदोष यंत्रणेचे तुरळक लाभार्थी आढळले.
राज्यातील अत्यंत गरीबांना आणि मध्यमवर्गीयांपर्यंत रेशनची वितरण व्यवस्था पोहचवण्याकरीता आणखी सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘आरसीएमएस’ ही यंत्रणा सुरु केली. मात्र ती सदोष झाल्यामुळे या प्रणालीचे काम अत्यंत संथ सुरु आहे.

राज्यातील बहुतांशी पुरवठा अधिका-यांनी आणि कर्मचा-यांनी ही बाब मुंबईतील मुख्य शिधावाटप नियंत्रकांसह अन्य सर्व परिमंडळांच्या नियंत्रकांना लेखी कळवली आहे. ही प्रणाली दुरुस्त करण्याची जबाबदारी ‘एनआयसी’ची असतानाही अद्याप काहीच हालचाली झालेल्या नाहीत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिका-याने दिली.

ठाण्यासह मुंबई व अन्य जिल्ह्यांतील पुरवठा अधिका-यांना अनेक लाभार्थ्यांच्या प्रश्नांना दररोज उत्तरे देताना नाकीनऊ आले आहे. त्यांना एकही समाधानकारक उत्तर देऊ शकत नाहीत. आमची अवस्था ‘इकडे आड- तिकडे विहिर’अशी झाली आहे, अशी प्रतिक्रिया एका पुरवठा अधिका-याने ‘ठाणेवैभव’कडे व्यक्त केली.

गेल्या पाच महिन्यांपासून ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर त्यात वारंवार विविध दोष आढळले. कारकुनाला एकच लॉग इन आय.डी. देण्यात आला आहे. यंत्रणा ‘संथ असल्यामुळे दररोज फक्त ४ ते ५ कार्ड ऑनलाईन मिळतात आणि अवघ्या २० ते २५ जणांचीच आधार कार्ड ‘लिंक’ होतात. ‘महाफुड.जीओव्ही.इन’ हे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे संकेतस्थळ आहे.

सदोष यंत्रणेमुळे डोक्याला मन:स्ताप या नव्या सिस्टीममध्ये लॉग इन करताना ब-याचदा ‘ओटीपी’ पाठवला जात नाही. कधी अनेकदा ‘आधार क्रमांक’ अद्ययावत  होत नाही, जर आधारकार्ड अपडेट झाल्यास १२ आकडी नंबर मिळत नाही अन्यथा वारंवार ‘युआयडी ऑथेंटिकेशन एरर’ असा मेसेज स्क्रीनवर दिसत राहतो शिधावाटप पत्रिकेत नाव वाढवणे किंवा कमी करणे या प्रक्रियाही सदोष यंत्रणेमुळे पूर्ण होत नाही.