नवी मुंबई : वाशीतील एपीएमसी बाजारात कांद्याची आवक कमी झाल्याने दराने पुन्हा उसळी घेतली आहे. गुरुवारी बाजारात पुन्हा बाजारात वाढ झाली असून घाऊकमध्ये प्रतिकिलो कांदा ५०-६५ रुपये तर किरकोळ बाजारात ८०-९० रुपयांवर पोहचला आहे.
एपीएमसी बाजारात नवीन कांदा दाखल होताच कांद्याचे दर आवाक्यात येतील अशी आशा होती. सुरुवातीला दर स्थिरावले होते. मात्र आता पुन्हा आवक कमी होत असल्याने दरवाढ झाली आहे. अवेळी पडलेल्या पावसाने कांद्याच्या उत्पादनावर परिणाम होत असून दरात चढउतार पहावयास मिळत आहे. बाजारात गुरुवारी १५७ गाड्या दाखल झाल्या असून यामध्ये २०-२५ गाडी जुना कांदा तर यर उर्वरित नवीन कांदा आवक सुरू आहे. मात्र जुन्याला मागणी असल्याने त्यांच्या दरात वाढ होत आहे. आधी ५५-६० रुपयांनी विक्री होणारा कांदा आता ६०-६५ रुपयांनी विक्री होत आहे.तर किरकोळ बाजारात ८५-९० रुपयांनी विक्री होत आहे. त्यामुळे आवक अशीच राहिली तर लवकरच कांदा शंभरी पार करणार असल्याची शक्यता येथील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
यंदाही नवीन कांदा ठरतोय वरचढ
एपीएमसी बाजारात नवीन कांदाचे बाजारभाव हे जुन्या कांद्यापेक्षा कमी असतात. परंतु आता नवीन कांद्याचे दरही चढेच आहेत. मुसळधार पडलेल्या पावसाने नवीन कांद्याचे उत्पादन देखील घटले. त्यामुळे जुन्या कांद्याबरोबर नवीन कांदाही भाव खात आहे. आता बाजारात आधी नवीन कांदा ३०-५० रुपयांनी विक्री होत होता, मात्र आता तो ४५-५५ रुपयांवर पोचला आहे.