कडोंमपा हद्दीत कोरोनाचा एक बळी; चार रुग्णांवर उपचार सुरु

नागरीकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचा शिरकाव झाला असून कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. चार कोरोना रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्य खात्याचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी दिली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या महितीनुसार गुरुवारी एका 47वर्षीय महिलेला टायफॉइड झाल्याने खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता शुक्रवारी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शनिवारी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याची महिती समोर आली. सद्यस्थितीत कोरोनाबाधित चार रूग्णांपैकी एक रूग्ण घरी उपचार घेत असून, दोन कोरोनाबाधित रुग्णांवर रूग्णालयात उपचार सुरू असून एका कोरोनाबाधित रूग्णावर कळवा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

या पार्श्वभूमीवर नागरीकांनी आरोग्यविषयी सतर्कता बाळगावी, असे आवाहन आरोग्य खात्याकडून करण्यात आले आहे.

महापालिकेने कल्याणच्या रुक्मीणीबाई आणि डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात आयसाेलेशन वॉर्ड सुरु केले आहेत तसेच उद्यापासून कोरोना टेस्टकरीता आरटीपीसी टेस्ट लॅबही सुुरु केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त बोरकर यांनी दिली आहे.