विधान परिषदेसाठी शिवसेनेतून रविंद्र फाटक, संजय मोरे, गणेश साळवी इच्छुक
ठाणे: विधान परिषदेसाठी हाती आलेल्या एका जागेसाठी शिवसेना शिंदे गटाचे तीन ठाणेकर इच्छूक आहेत. या तिन्ही इच्छूकांना विधानपरिषदेचे आश्वासन देण्यात आल्याने आपली या पदासाठी वर्णी लागावी यासाठी मार्चेबांधणी सुरू झाली आहे.
इच्छूकांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे सचिव आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू संजय मोरे, माजी आमदार रविंद्र फाटक यांचा समावेश आहे. तर शिवसेनेची संघटना मजबूत करण्यासाठी काही वर्षांपूर्वी स्थायी समिती सदस्य पदाचा राजिनामा देत राष्ट्रवादीला रामराम ठोकलेल्या गणेश साळवी यांचेही नाव चर्चेत आहे. या तिघांपैकी कोण बाजी मारणार की वेगळ्याच नावाला लॉटरी लागणार हे उद्या अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी कळणार आहे.
विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी २७ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. महायुतीत भाजपने तीन जागा आपल्याकडे राखत उर्वरित एक शिवसेना शिंदे गट तर एक राष्ट्रवादी अजित पवार गटाला दिली आहे. भाजपने संदीप जोशी, संजय केनेकर व दादाराव केचे यांचे नाव जाहिर केले आहे. हे तीनही उमेदवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे विधानपरिषदेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या निकटवर्तीयांपैकी एकाची वर्णी लावावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यामध्ये सध्या ठाणेकर असलेले संजय मोरे आणि विदर्भातील शिंदे गटाचा चेहरा असलेले किरण पांडव यांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये संजय मोरे मुख्य दावेदार मानले जात आहेत.
माजी महापौर असलेल्या नरेश म्हस्के यांना खासदारकीची लॉटरी लागली. त्यामुळे आपल्या पदरात किमान आमदारकी पडावी अशी अपेक्षा मोरे यांची आहे. त्यासाठी पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात ते उतरले होते. पण भाजपच्या निरंजन डावखरे यांच्यासाठी पक्षश्रेष्ठीने मध्यस्थी केल्याने त्यांची संधी हुकली. त्यामुळे आता विधानपरिषदेचे दरवाजे उघडे करून आतापर्यंत पक्षासाठी आणि पक्ष श्रेष्ठींसाठी केलेल्या कामाची पोचपावती त्यांना मिळते का हे पहावे लागणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेत आमदार बनून जाण्याचे स्वप्न रविंद्र फाटक यांचे पूर्ण झाले होते. मात्र तो कार्यकाळ संपला असून पालिका निवडणुका रेंगाळल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेचे भवितव्य अधांतरी असल्याने त्यांनी लोकसभा निवडणुकीत खासदारकीचे स्वप्न पाहिले होते. त्यावेळी त्यांना विधानपरिषदेचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे माजी आमदार रविंद्र फाटक हे सुद्धा या जागेसाठी इच्छूक आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत सातत्याने उभे असणार्या खंद्या समर्थकांपैकी ते एक आहेत. दुसरीकडे कळवा येथील राष्ट्रवादीचा त्याग केल्याने स्थायी समिती शिवसेनेच्या ताब्यात आणण्याची मोलाची कामगिरी करणारे सध्या शिवसेना शिंदे गटात सक्रीय असलेले गणेश साळवी यांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत. पक्षप्रवेश करताना त्यांना आमदार करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. या आश्वासनाची पूर्तता होण्याची त्यांना अपेक्षा आहे. शिंदे दिलेला शब्द मोडत नाहीत, त्यामुळे त्यांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत, त्यांनीही आपली आशा सोडलेली नाही.
विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस सोमवार १७ मार्च आहे. अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास उरलेले असतानाही शिवसेना शिंदे गटाने आपले नाव जाहिर केलेले नाही. नाराजी नाट्य टाळण्यासाठी ही खेळी केली जात आहे. एक अनार सौ बिमार अशी स्थिती सध्या शिवसेना शिंदे गटाची आहे. अशावेळी उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे मुख्य नेते असलेले एकनाथ शिंदे यांचे कौशल्य पणाला लागणार आहे.