कळवा नवीन पुलाची एक मार्गिका ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण होणार

ठाणे : ठाणे-कळवा दरम्यान बांधकाम सुरू असलेल्या तिसऱ्या पुलाच्या पोलीस आयुक्त कार्यालय ते कळवा नाका व ठाणे-बेलापूर रोड या एका मर्गिकेचे काम कोणत्याही परिस्थितीत २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आज ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी संबंधित विभाग आणि कंत्राटदार यांना दिले.

अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी आज ठाणे-कळवा दरम्यान ठाणे महापालिकेमार्फत बांधण्यात येत असलेल्या तिसऱ्या पूलाच्या कामाची पाहणी केली. एकूण २.४० किमी लांबीच्या या पुलाचे ९० टक्के काम पूर्ण झालेले आहे. त्या कामाचा आढावा श्री. माळवी यांनी अधिकाऱ्यांसह घेतला. त्यावेळी मुख्य तांत्रिक अधिकारी प्रवीण पाफळकर, कार्यकारी अभियंता धनाजी मोदे, उप अभियंता आसावरी सोरटे आदी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त कार्यालय ते कळवा चौक आणि ठाणे बेलापूर रोड या एका मार्गिकेचे काम २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण न झाल्यास कारवाई करण्याचा इशाराही संदीप माळवी यांनी दिला. या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यावर ती वाहतुकीस खुली केल्यावर ठाणे – कळवा दरम्यानची वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास श्री. माळवी यांनी व्यक्त केला.

पुलाच्या कामाच्या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी तांत्रिक माहिती घेतली. तसेच संबंधित अडचणींवर मात करून एक मार्गिका काहीही करून पूर्ण करा, असे निर्देश दिले.