एप्रिलमध्ये ९० लाखांचे उत्पन्न
नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरूळ मधील वंडर्स पार्क हे नुतनीकरणानंतर पर्यटक आणि बच्चे कंपनीचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. एप्रिल महिन्यात या पार्कला एक लाख २,४९२ जणांनी भेट दिली असून त्यापोटी पालिकेच्या तिजोरीत ९० लाख ६१,५९५ रुपयांची भर पडली आहे.
नवी मुंबई शहरातील उद्याने सोडली तर बच्चे कंपनीच्या पर्यटनासाठी अधिक जागा नसल्याने नागरिक मनपा मुख्यालय तसेच शॉपिंग मॉलला पसंती देत असत. मात्र नेरूळमध्ये महानगर पालिकेने वंडर्स पार्क बांधल्यानंतर पर्यटकांची पाऊले या पार्ककडे वळू लागली. अल्प अल्पावधीतच नवी मुंबईतील सर्वात भव्य उद्यान म्हणून वंडर्स पार्कची ओळख तयार झाली. मात्र कोरोना काळात हे उद्यान नागरिकांसाठी बंद ठेवले होते. या दरम्यान पुन्हा एकदा २७ कोटी खर्च करून उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम केले.
उद्यानात नवीन राईड, लेझर शो, खेळणी ट्रॉय ट्रेन, मॅजिक शो बसविण्यात आले आहेत. त्यामुळे दिवसागणिक या ठिकाणी पर्यटकांचा ओढा वाढत गेला. आजमितीस जून ते मार्च २०२४ पर्यंत सात लाख २३,३३१ जणांनी या पार्कला भेट दिली आहे. त्यापोटी चार कोटी ४१ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. एप्रिल २०२४ मध्ये या पार्कला एक लाख २३९२ पर्यटकांनी विक्रमी भेट दिली असून त्यापोटी पालिकेच्या तिजोरीत ९० लाख ६१,५९५ रुपयांची भर पडली आहे.
सध्या सुरू असलेल मे महिना आणि शाळेला पडलेली सुट्टी पाहता या महिन्यात सव्वा लाखावर पर्यटक भेट देतील, असा अंदाज येथील व्यवस्थापनाने वर्तवला आहे.