एक लाख विद्यार्थ्यांनी घातले सूर्यनमस्कार

बदलापूर: रथसप्तमीनिमित्त मुरबाड मतदारसंघातील विविध शाळा आणि महाविद्यालयामधील सुमारे एक लाख विद्यार्थ्यांनी मंगळवारी सुर्यनमस्कार घातले.

आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या आजच्या उपक्रमात बदलापूर, मुरबाड आणि कल्याण तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. बदलापुरात आमदार कथोरे, शहराध्यक्ष शरद तेली, संजय भोईर, माजी नगराध्यक्ष रामभाऊ पातकर , राजन घोरपडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रथसप्तमीच्या मुहुर्तावर एक लाख सुर्यनमस्कार उपक्रम हाती घेण्यात आला होता. गेल्या एक महिन्यांपासून सुमारे ११७ महाविद्यालय आणि २५० शाळांमध्ये या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. २०० पेक्षा अधिक प्रशिक्षक एक महिन्यांपासून ऑनलाईन आणि प्रत्यक्ष सराव करून घेत होते. त्यामुळे आज मंगळवारी या उपक्रमात सुमारे एक लाख विद्यार्थी, शिक्षक, नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी सुर्यनमस्कार घातल्याची माहिती आमदार कथोरे यांनी दिली आहे. मुंबई विद्यापीठ आणि डॉ. कुकरेजा यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या झाल्याचे कथोरे यांनी सांगितले.