कल्याण : कल्याणमधील ठाणकर पाडा येथे राहणारे चंद्रकांत वरक यांना आयकर विभागाकडून तब्बल एक कोटी १४ लाख रुपयांची नोटिस पाठविण्यात आली. ही नोटीस पाहून वरक यांना धक्का बसला आहे.
वरक हे ठाणकर पाडय़ातील दुर्गानगर येथे राहतात. ते ठाण्यातील एका कुरिअर कंपनीत हाऊस किपिंगचे काम करतात. ते आणि त्यांची बहिण हे दोघेच कुटंबातील सदस्य आहेत. वरक यांना त्यांच्या कंपनीकडून महिन्याला जेमतेम १० हजार रुपये पगार मिळतो. त्यांचे वर्षिक उत्पन्न १ लाख २० हजार रुपये आहे. ते नेहमीप्रमाणे घरातून ठाण्याला कामावर जाण्यासाठी निघाले असता त्यांना आयकर विभागाची नोटिस त्यांच्या हाती पडली. ही नोटिस चक्क एक कोटी 14 लाख रुपये रक्कमेची होती.
या नोटिसमध्ये नमूद करण्यात आले होते की त्यांच्या पॅनकार्डचा संदर्भ देत एक कोटी १४ लाख रुपयांचे व्यवहार झालेले आहेत. त्यांच्या हाती पडलेली नोटिस त्यांनी अनेक वेळा वाचून काढली. मात्र त्यातील नमूद रक्कमेचे व्यवहार पाहून ते हवालदिल झाले. त्यांची स्थिती एकदम चक्रावून गेली. त्यांनी ही नोटिस मिळताच आयकर कार्यालयात धाव घेतली. तेव्हा त्याठिकाणच्या अधिकारी वर्गानेही त्यांना नोटिसमध्ये नमूद असलेला आशय विषद करून पॅन कार्डचा संदर्भ देत एक कोटी १४ लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे सांगितले. तसेच त्यांना पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा सल्ला दिला. मात्र वरक यांनी अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली नाही.