मेफेड्रोन अमली पदार्थासह एकास अटक
कल्याण : कल्याण व डोंबिवली शहर परिसरात बेकायदेशीर अमली पदार्थ विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करत परिमंडळ ३ कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या विशेष पथकाने व खडक पाडा पोलीस ठाण्याने संयुक्त कारवाई केली. १७ मे २०२५ रोजी ८.१५ वाजता. खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९० फुटी रोडवरील अटाळी आंबिवली जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर ही कारवाई पार पडली.
या कारवाईदरम्यान गुलाम मोसन खान उर्फ इराणी (३५) रा. इंद्रानगर झोपडपट्टी, आंबिवली, कल्याण यांच्याकडून २९ ग्रॅम वजनाचा मेफोड्रोन (एम.डी.) अमली पदार्थ जप्त करण्यात आला. या पदार्थाची अंदाजे किंमत ५६ हजार रुपये असून, पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ अंतर्गत कलम ८(क) व २०(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुलाम मोसन खान उर्फ इराणी याच्यावर यापूर्वीही खडकपाडा , महात्मा फुले चौक, व नारपोली पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. ही कारवाई परिमंडळ ३ कल्याणच्या विशेष पथक व खडकपाडा पोलीस ठाण्याच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली असून, अशा बेकायदेशीर कृत्यावर कारवाई पुढेही चालू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.