एकीकडे ‘स्मार्ट’ गाणी; दुसरीकडे अशुद्ध पाणी !

ठाणेकरांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह

ठाणे : ठाणेकरांना पाणी विभागातून वितरित होणारे पाणी ९३ टक्के तर साठवण टाक्यांमधून पुरवठा होणारे पाणी ८४ टक्के शुद्ध असल्याचा अहवाल खुद्द ठाणे पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केला आहे. धक्कादायक म्हणजे विकासात भरारी मारणारी पालिका ठाणेकरांना शुद्ध पाणी देण्यात तब्बल पाच वर्षे बॅकफूटवर गेली आहे.

ठाणे महापालिका शुद्ध पाण्यासाठी लाखो रुपये खर्च करते तरी देखिल पाण्याचे ९५ टक्के नमुने हे पिण्यायोग्य असावेत असे मानक असतानाही या मापदंडात ठाणे महापालिका अपयशी ठरल्याचे समोर आले आहे. ठाणे महापालिकेकडून घराघरांत पाणीपुरवठा केला जातो. या पाण्याची गुणवत्ता सलग दुसर्‍या वर्षी घसरली आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दरवर्षी वार्षिक अहवाल प्रसिद्ध होतो. या अहवालात प्रथमदर्शनी सर्वकाही आलबेल असल्याचे दाखवण्यातआले आहे. मात्र त्याचवेळी पाण्याच्या शुद्धतेबाबतचा अहवाल तितकासा चांगला नसल्याचे दिसून आले आहे. दरवर्षीप्रमाणे ठाणे महापालिकेने पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी विविध ठिकाणाहून पाण्याचे नमुने घेऊन चाचण्या केल्या. २०२२- २३ मध्ये वितरण प्रणालीच्या पाण्याचे १३,०२४ पैकी ९३ टक्के पाण्याचे नमुने पिण्यायोग्य आणि सात टक्के नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे आढळले. आरोग्य विभागाद्वारे साठवणूक केलेल्या पाण्याचे नुमने तपासले असता २६,७९६ नमुने पिण्यायोग्य आढले आणि १६ टक्के नमुने पिण्यास अयोग्य आढळले. पिण्याच्या पाण्याचे ९५ टक्के नमुने हे पिण्यायोग्य असावेत असा मानक आहे. मात्र या निकषाची पुर्तता करण्यात ठाणे पालिकेला अपयश आल्याने या मानकाचा उल्लेख अहवालात करणे प्रशासनाने टाळले असल्याचे दिसले. २०२० ते २०२३ पर्यंतच्या पाणी अहवाल तपासला असता हे शुद्धतेचे प्रमाण तीन टक्क्यांनी घटले आहे.

ठाणे महापालिका हद्दीत सुमारे ५८५ एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. त्यापैकी २५० दशलक्ष लीटर पाणी ठाणे महापालिकेतर्फे तर ३३५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा मुंबई महापालिका, एमआयडीसी आणि स्टेमकडून होतो. हे पाणी टेमघर येथील केंद्रात प्रक्रिया करून ते जलकुंभात साठवले जाते. ७८० किमी लांबीच्या जलवाहिन्यांतून हे पाणी शहरातील प्रत्येक घरात पोहचावे यासाठी शहराची तीन मुख्य विभागात ४४ ठिकाणी विभागणी करण्यात आली आहे. सुमारे ७१ जलकुंभात हे पाणी साठवण्यात येते. या साठवण टाक्यांसह शहरातील ठिकठिकाणच्या पाण्याची गुणवत्ता दरवर्षी तपासली जाते.

२०१७- १८ साली पाण्याची गुणवत्ता ९३ टक्के होती, ती २०२०- २०२१ ला ९६ टक्क्यांवर पोहचली. त्यानंतर २०२१- २२ ला पुन्हा त्यात घसरण होत ९५ टक्के झाली. पण २०२२- २३ मध्ये ही वितरण व्यवस्था पुन्हा घसरली आहे.

वितरण प्रणालीचा अहवाल

सन एकूण नमुने

पिण्यायोग्य पिण्याअयोग्य
गुणवत्ता

२०२०- २१ १४३०५ १३७५५ ६२० ९६ टक्के
२०२१- २२ १४९०३ १४११७ ७८६ ९५ टक्के
२०२२- २३ १३०२४ १२०९९ ९२५ ९३ टक्के

साठवण टाक्यांमधील अहवाल

सन एकूण नमुने *
पिण्यायोग्य पिण्याअयोग्य गुणवत्ता

२०२०- २१ १४१७६ ११९७२ २२०४ ८४ टक्के
२०२१- २२ २४११० १९६७० ४४४० ८३ टक्के
२०२२- २३ २६७९६ २२४४२ ४३५४ ८४ टक्के