ठामपाकडून वर्षभरात १४९ कोटी वसूल
ठाणे: ठाणे महापालिकेने सन २०२४-२५ या वर्षात पाणी बिलांपोटी १४८ कोटी ९५ लाख रुपयांची वसुली करण्यात यश मिळवले आहे. गतवर्षीपेक्षा ही वसुली १५ कोटी रुपयांनी अधिक आहे. पाणी पुरवठा विभागाने केलेल्या आक्रमक पाठपुराव्यामुळे अखेरच्या दिवशी सात कोटी रुपयांची वसुली करण्यात यश मिळाले.
ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार, पाणी ग्राहकांकडून सन २०२४-२५च्या चालू वर्षाच्या बिलांपोटी १४७ कोटी रुपये तर थकबाकीपोटी ७८ कोटी रुपये असे एकूण २२५ कोटी रुपये वसूल करायचे होते. या वर्षी चालू बिलांच्या रकमेपोटी ९४ कोटी ५४ रुपये वसूल झाले आहेत. तर, थकबाकीपोटी ४० कोटी ४१ लाख रुपयांची वसुली झाली आहे. त्याचबरोबर, मुख्यालय येथे १४ कोटी रुपयांच्या बिलांचा भरणा झाला आहे. या आर्थिक वर्षात एकूण १४८ कोटी ९५ लाख रुपयांची वसुली झाली आहे.
पाणी पुरवठा विभागाने अधिकाधिक वसुली करून उद्दीष्टपूर्ती करावी, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. त्यानुसार, सप्टेंबर-२०२४मध्ये अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मीटर रीडरना साप्ताहिक उद्दीष्ट निश्चित करून देण्यात आले. तसेच, अवैध नळ संयोजने खंडित करण्यासाठी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार, पाणी पुरवठा विभागाचे मीटर रिडर, उपअभियंता, प्रभाग समितीतील कर्मचारी, सहाय्यक आयुक्त आणि परिमंडळ उपायुक्त यांच्या प्रयत्नांमुळे गेल्यावर्षीपेक्षा १५ कोटी रुपयांची अधिक पाणी बील वसुली करणे शक्य झाल्याचे उपनगर अभियंता (पाणी पुरवठा) विनोद पवार यांनी सांगितले.
१३१५६ नळजोडण्या खंडित
बील वसुलीसाठी पाठपुरावा करताना पाणी पुरवठा विभागाने वर्षभरात, १३१५६ जल जोडण्या खंडित केल्या. १३८३७ ग्राहकांना नोटीसा दिल्या. २३७४ मोटप पंप जप्त करण्यात आले. तर, ६७६ पंप रुम सील करण्यात आले.
ज्या ग्राहकांकडे पाणी बिलाची थकबाकी आहे, त्याचा पुन्हा आढावा घेऊन थकबाकी वसुली केली जाणार आहे. जे ग्राहक चालू वर्षाच्या बिलासह थकबाकी भरणार नाहीत, त्यांच्या जलजोडण्या खंडित करण्याची कारवाई सातत्याने सुरूच राहणार असल्याचे विनोद पवार यांनी स्पष्ट केले.
प्रभाग वसुली
माजिवडा मानपाडा : २९,३८,२६,६६६
नौपाडा-कोपरी : १८,४६,४०,०१७
वर्तकनगर : १४,५७,०६,९१८
उथळसर : ११,३५,२३,९१८
कळवा : १६,३४,०९,८२८
वागळे : ०८,४३,५७,४२९
लोकमान्य- सावरकर नगर : ०९,८०,२२,९५१
मुंब्रा : १२,१४,३८,६६६
दिवा : १३,५०,८७,९९९
मुख्यालय-सीएफसी : १३,३०,३७,९५३
मॅन्यूअल व्यावसायिक बील : ०१,६५,३५,४१९
एकूण : १४८,९५,८७,७६४