ठाणे : आधीच कोरोना…वाढती महागाई त्यातच विवाहावर होणारी लाखो रूपयांची उधळपट्टी रोखत ठाण्यातील तरूणाईचा रजिस्टर पद्धतीने विवाह करण्याकडे कल वाढत आहे. यंदा व्हॅलेंटाइन डेचा मुहूर्त साधत ठाणे जिल्ह्यातील सुमारे ४० जोडपी रेशीमबंधनात अडकले. ठाण्यातील दुय्यम निबंधक कार्यालय येथे हा सोहळा पार पडला.
कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून रजिस्टर पद्धतीने विवाह करण्यास पसंती दिली जात आहे. सरकारी नियमांचे पालन करत मोजक्याच लोकांमध्ये कमी खर्चात विवाहसोहळा पार पाडण्यासाठी ठाण्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात दररोज मोठ्या प्रमाणात नोंदणी होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून कोरोनामुळे विवाहमधील लोकांच्या उपस्थितीबाबत निर्बंध आल्याने विवाह मोजक्याच लोकांमध्ये पार पाडला जात आहे. गेल्या वर्षी व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी रविवार आल्याने विवाह नोंदणीचे दुय्यम निबंधक कार्यालय बंद होते. त्यामुळे यंदा या व्हॅलेंटाइन डे मुहूर्त न चुकवता विवाह करण्याचे अनेक वधू-वरांनी निश्चित केले. त्यामुळे आज सकाळपासूनच मासुंदा तलाव परिसरातील कार्यालयात विवाह जोडपी दिसून येत होती. दिवसभर विवाह नोंदणी करण्यासाठी त्यांची व नातेवाईकांची लगबग कार्यालयात होती.
दरवर्षी व्हॅलेंटाइन डेचा मुहूर्त
साल – विवाह
२०१८ – २३
२०१९ – ३५
२०२० – २०
२०२१ – ०० (रविवार असल्याने)
२०२२ – ४०