कचऱ्याची विल्हेवाट जागीच; कोलशेत-गायमुख प्रकल्पाला गती

रोज १३० मेट्रिक टन कचऱ्यावर होणार प्रक्रिया

ठाणे : डम्पिंग ग्राउंडचा अभाव आणि वाढता कचरा या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने छोटे छोटे प्रकल्प उभारणीवर भर दिला आहे. कचरा निर्मूलनासाठी कोलशेत आणि गायमुख या ठिकाणी छोटे प्रकल्प उभारण्याचे नियोजन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

या दोन्ही प्रकल्पांना गती मिळाली असून कोलशेत येथील प्रकल्प येत्या चार ते पाच दिवसांत कार्यान्वित होण्याची चिन्हे असून गायमुख येथील प्रकल्पासंदर्भात कार्यादेश देण्यात आला असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. कोलशेत येथील प्रकल्पामध्ये ३० तर गायमुख येथील प्रकल्पात १०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज एक हजार टनाच्या आसपास कचरा निर्माण होतो. त्यापैकी ४५० टन कचरा हा ओला कचरा असतो. ठाणे महापालिकेची स्वत:ची कचराभूमी नाही. यामुळे दिवा, त्यानंतर शहराबाहेर म्हणजेच भंडार्ली येथे कचरा टाकला जात होता. अखेर पालिकेने डायघर भागात कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प उभारून तिथे शहरातील कचरा नेण्यास सुरूवात केली आहे. असे असले तरी शहरात दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणारी गृहसंकुले आणि आस्थापनांनी कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारावेत, असे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. त्याचबरोबर शहराच्या विविध भागात छोटे-छोटे कचरा विल्हेवाट प्रकल्प पालिकेकडून उभारण्यात येत आहेत. घोडबंदर भागातील हिरानंदानी इस्टेट भागात ३५ टन कचऱ्यावर प्रक्रीया केली जात आहे. उथळसर येथे १० टन, कौसा येथे १० टन, कळवा रुग्णालय येथे २५ टन कचरा विल्हेवाट प्रकल्प असून याठिकाणी कचऱ्यापासून खत निर्मिती केली जात आहे.

महापालिका घनकचरा विभागाच्या माध्यमातून कोलशेत परिसरात ३० टनचा कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात येत आहे. गायमुख भागात १०० टन कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात येत आहे. या ठिकाणी ओल्या कचऱ्यावर प्रक्रीया करून खत निर्मिती केली जाणार आहे. शहराच्या इतर भागातही अशाच प्रकारे छोटे प्रकल्प उभारण्यावर पालिकेने भर दिला आहे. परिणामी कचऱ्याची विल्हेवाट त्याच ठिकाणी लागणार असल्याने कचरा वाहून नेण्याचा वाहतूक खर्चात देखील बदल होणार असल्याचा दावा पालिकेच्या वतीने करण्यात आला आहे.

कोलशेतचा प्रकल्प १५ दिवसांत तर गायमुख प्रकल्प तीन ते चार महिन्यात सुरु करण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र त्यांनतर या प्रकल्पांना फारशी गती मिळाली नव्हती आता दोन्ही प्रकल्पांना खऱ्या अर्थाने गती मिळाली असून लवकरच हे दोन्ही प्रकल्प सुरु होण्याची चिन्हे आहेत.

असे आहेत छोटे प्रकल्प

हिरानंदानी इस्टेट : ३५ मॅट्रिक टन
उथळसर : १० मॅट्रिक टन
कौसा : १० मॅट्रिक टन
कळवा रुग्णालय : २५ मॅट्रिक टन

नव्याने सुरु होणारे प्रकल्प
कोलशेत : ३० मॅट्रिक टन
गायमुख : १०० मॅट्रिक टन