ठाणे: ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून आरक्षण सोडतीची तारीख अखेर जाहीर झाली आहे. ३१मे रोजी विद्यमान नगरसेवकांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या प्रभागांचा अंतिम आराखडा १४ मे ला प्रसिद्ध केला. १४२ नगरसेवक असलेल्या महापालिकेत तीन सदस्यांचे ४६ तर चार सदस्यांचा एक असे ४७ प्रभाग असणार आहेत. निवडणूक आयोगाने कमीत कमी ३४ हजार ते जास्तीत जास्त ४२ हजारांची लोकसंख्या असलेला तीन सदस्यांचा प्रभाग असे ४६ प्रभाग तयार केले आहेत तर चार सदस्यांचा प्रभाग ४९ हजार ते ५७ हजार लोकसंख्येचा आहे.
१४२ सदस्य असलेल्या महापालिकेत ७१ महिला सदस्यांची आरक्षण सोडत ३१ मे रोजी काढण्यात येणार आहे. दहा जागा अनुसूचित जातीकरिता राखीव ठेवण्यात आल्या असून त्यापैकी पाच जागांवर महिलांकरिता लॉटरी काढली जाणार आहे तर अनुसूचित जमातीकरिता तीन जागा राखीव असून त्यापैकी दोन जागा महिलांकरिता आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
ही सोडत महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली गडकरी रंगायतन किंवा काशिनाथ घाणेकर नाट्यगृह यापैकी एका ठिकाणी काढण्यात येणार आहे. ठाणेकर नागरिकांच्या उपस्थितीत ही सोडत शाळेच्या लहान मुलांच्या हातून काढण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.