अभियंता दिनी आमदार किणीकर यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

निधी मंजुरीनंतरही विकासकामे सुरु न झाल्याने विचारला जाब

अंबरनाथ : विकास कामांसाठी निधी आणून देखील कामे करण्यात दिरंगाई करणाऱ्या कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा अभियंता दिनीच जाब विचारत आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी नगरपालिका अधिकाऱ्यांना चांगले फैलावर घेतले.

अंबरनाथमध्ये एमएमआरडीए तसेच शासनाकडून विविध माध्यमातून निधी आणून देखील नागरिकांना असंख्य गैरसोयींचा.त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढल्यावरून आज गुरुवारी (१५) सप्टेंबर रोजी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेवरून आमदार डॉ. किणीकर यांनी नगरपालिका सभागृहात आढावा बैठक आयोजित केली होती. माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, माजी नगरसेवक सुभाष साळुंके, रविंद्र  पाटील, परशुराम पाटील, पुरुषोत्तम उगले, गणेश कोतेकर नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ,प्रशांत शेळके, एमएमआरडीएचे अधिकारी आदी उपस्थित होते.

शहरातील कचऱ्याच्या समस्येवरून उपस्थित सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. वारंवार सांगूनही रस्त्यांमध्ये कचरा टाकला जातो, कचरा उचलला जात नाही आणि कचरा टाकणाऱ्यांवर आरोग्य खात्याकडून दंडात्मक कारवाई केली जात नाही. कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार डॉ. किणीकर यांनी केली.

एमएमआरडीएमार्फत तयार झालेल्या कल्याण-बदलापूर महामार्गावर अपघात होत आहेत. त्यावरील पथदिवे देखील बंद असून ते त्वरित सुरु करावेत, अशी मागणीही त्यांनी केली. नगरपालिका आणि एमएमआरडीए या दोन्ही संस्थांनी अपूर्ण असलेली कामे पूर्ण करावीत, चुकीची कामे दुरुस्त करावीत, पूर्व आणि पश्चिम दिशेला मंजुरी मिळालेल्या सॅटिसच्या कामांना सुरुवात करावी, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत आदी विषयांवर चर्चा झाली. उखडलेले पेव्हर ब्लॉक दुरुस्त करावेत, अशी मागणी करण्यात आली.

विकासकामे करताना कुठेही भेदभाव करू नये, सर्वांना समान न्याय द्यावा,  अधिकाऱ्यांनी कुणाच्याही दबावाखाली काम करू नये, असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असे प्रकार घडल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करू असा इशारा आमदार डॉ. किणीकर यांनी दिला.

शहरात कचरा साचलेल्या ठिकाणी त्वरित स्वच्छता करावी, कार्यालयीन कामकाजाची वेळ प्रत्येकाने पाळावी, कामगार, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब केला जाईल, अशी माहिती मुख्याधिकारी  डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली.