उल्हासनगर विधानसभेतून ओमी कालानी निवडणुकीच्या रिंगणात

शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीला पसंती

उल्हासनगर: लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करणारे टीम ओमी कालानीचे सर्वेसर्वा युथ आयकॉन ओमी कालानी यांनी उल्हासनगर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी ओमी यांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला पसंती दिली असून पवार यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही तर अपक्ष निवडणूक लढवणार असेही स्पष्ट केले आहे.

कालानी कुटुंबातून पप्पू कालानी यांनी चारदा, स्वर्गीय ज्योती कालानी यांनी एकदा आमदार पद भूषविले आहे. यावेळी ओमी कालानी यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले असून शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीकडे तिकीट मागणार असे पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

भाजपाचे ज्ञानेश्वर पाटील यांनी टीम ओमी कालानीमध्ये प्रवेश केल्यावर ते बोलत होते. विशेष म्हणजे ओमी कालानी यांचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यासोबत मैत्रीचे नाते आहे. त्यामुळेच त्यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा प्रचार केला नाही आणि दोस्ती का गठबंधन या बॅनरखाली डॉ.शिंदे यांना समर्थन दिले होते.

ओमी कालानी यांच्या पत्नी या राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या उल्हासनगर जिल्हाध्यक्ष आहेत. ओमी यांचे वडील माजी आमदार पप्पू कालानी हे ओमी यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणार असून ते विविध कार्यक्रमात सहभागी होऊन वातावरण निर्मिती करू लागले आहेत.

ओमी कालानी यांनी 30 तारखेला गोव्यात महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले असून त्यात टीम ओमी कालानीचे सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि पत्रकार यांच्या उपस्थितीत आमदारकीची रणनीती आखली जाणार आहे. विविध पक्षाचे माजी नगरसेवक संपर्कात असून त्यांच्या नावांचा आणि प्रवेशाचा गौप्यस्फोट लवकरच होणार असल्याचे ओमी कालानी यांनी सांगितले.