ठाणे : ठाणे महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागातील सव्वाशे वर्ष जुनी जन्म मृत्यूची नोंदणी संगणिकृत केली जात आहे. विभागतील सुमारे साडेचार लाख पाने स्कॅनिंग करण्याचे काम सुरू आहे. १८९६ पासूनच्या जुन्या मोडी लिपीत लिहिलेली अनेक पानांचा समावेश यामध्ये आहे.
ठाणे महापालिकेच्या जन्म आणि मृत्यू विभागात सुमारे सव्वाशे वर्ष जुनी महत्वाची कागदपत्रे आहेत. यामध्ये मराठीबरोबर मोडी लिपीत दस्तऐवज आहे. एवढी वर्षे हाताने लिहिलेली माहिती सांभाळून ठेवणे ही तारेवरची कसरत आहे. त्यामुळे हे दुर्मिळ दस्तऐवज तत्काळ मिळावेत, यासाठी जन्म-मृत्यूबरोबर आणखी महत्वाची कागदपत्रे स्कॅनिंग करण्याचा निर्णय झाला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि उपायुक्त मनीष जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सहा महिन्यांपासून तब्बल साडेचार लाख पाने स्कॅनिंग करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
ठाणे महापालिकेत जन्म आणि मृत्यूची १८९६ पासूनची माहिती उपलब्ध आहे. मोडी आणि मराठीत लिहिलेली माहितीची कागदपत्रे जीर्ण झाली आहेत. हा दस्तवेज खूप महत्त्वाचा असून, जुलै महिन्यापासून स्कॅनिंग करण्याचे काम सुरू झाले असून, पुढच्या काही दिवसात पूर्ण होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.