ओडिशा आणि हरियाणा यांच्यातील वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफी सामन्याचा निकाल कधी या बाजूला जात होता तर कधी त्या. ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या या रोमांचक सामन्यात ओडिशाने 47.5 षटकांत 138 धावांचा पाठलाग करताना दोन गडी राखून विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना हरियाणाचा डाव 40.3 षटकांत 137 धावांत आटोपला. ओडिशाने चेंडूंसह उत्कृष्ट प्रदर्शन केले. बिजया बेहेरा ही सर्वात यशस्वी गोलंदाज होती. तिने 9.3 षटकांत केवळ 19 धावा देऊन तीन गडी बाद केले. बेहेराला सुभ्रा स्वेन (2/29) आणि सोनाली हेमब्रम (2/22) यांनी चांगली साथ दिली. हरियाणाची कर्णधार, सोनिया मेंधीया ही लढतीतील एकमेव योद्धा होती. तिने सात चौकारांसह 71 चेंडूत 67 धावा ठोकल्या.
प्रत्युत्तरादाखल, तुलनेने सोप्या धावसंख्येचा पाठलाग करणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही. 28 जानेवारी रोजी दादोजी कोंडदेव स्टेडियमवर शतक झळकावणारी ओडिशाची सलामीवीर तन्मयी बेहेराने पुन्हा आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. या डावखुऱ्या फलंदाजाने एक बाजू धरून ठेवली आणि 112 चेंडूत 46 धावांची संयमी खेळी केली. कठोर परिश्रम केल्यावर, ती 38 व्या षटकात बाद झाली जेव्हा तिच्या संघाला विजयासाठी अद्याप 48 धावांची आवश्यकता होती.
तन्मयीला तंबूत परतताना बघून हरियाणाला विजय दिसू लागला. तथापि, जीएम अलकनंदा (31 चेंडूत 22 धावा) आणि तरण्णा प्रधान (26 चेंडूत नाबाद 20) यांच्या मनात काही वेगळ्या योजना होत्या. या दोघींनी आठव्या विकेटसाठी 44 धावांची सामना जिंकणारी भागीदारी केली आणि त्यांच्या संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला.
सामना संपल्यानंतर ठाणेवैभवशी बोलताना अलकनंदा म्हणाली, “आम्हाला शेवटपर्यंत लढायचे होते. आम्ही हरण्याचा विचार केला नाही. त्यापेक्षा शेवटपर्यंत खेळलो तर जिंकू, असा विश्वास वाटत होता. जेव्हा तरण्णा फलंदाजी करायला आली तेव्हा मी तिला फक्त एवढच सांगितले की तु बॉल मार आणि मी दुसऱ्या टोकाला धावीन.”
“आमच्यावर खूप दबाव होता. पण आम्हाला माहीत होते की जर आम्ही दोघे (अलकनंदा आणि तरण्णा) भागीदारी करू शकलो तर आम्ही जिंकू. खेळपट्टीने फिरकीपटूंसाठी अनुकूल होती आणि हरियाणाच्या गोलंदाजीत काही चांगले फिरकी गोलंदाज होते. म्हणून, आम्ही आमच्यासाठी लहान लक्ष्ये ठेवण्याचे ठरवले आणि आम्ही ते साध्य केल्यामुळे, विरोधी पक्षांवर दबाव वाढल्याचे आम्हाला जाणवले,” असे तरण्णाने नमूद केले.
अलकनंदा आणि तरण्णा हे गेल्या आठ-नऊ वर्षांपासून एकत्र क्रिकेट खेळत आहेत आणि घट्ट मैत्रिणी सुद्धा आहेत. अशा अनेक कठीण प्रसंगात त्यांनी भागीदारी केली आहे आणि म्हणून त्यांना अशा दबावाखाली खेळण्याचा अनुभव आहे.
हरियाणा ओडिशाला बाद करण्यात अपयशी ठरला. परंतु त्यांच्या गोलंदाजीमध्ये एक सकारात्मक बाब होती आणि ती त्यांची डावखुरी रिस्ट स्पिनर अमनदीप कौर. या 20 वर्षीय खेळाडूने तीन मेडन्ससह 10 षटकांत 20 धावा देऊन दोन गडी बाद केले.
भारतातील महिला क्रिकेटपटूंमध्ये डाव्या हातचे रिस्ट स्पिनर फारच कमी आहे. अमनदीप सांगते, “डाव्या हाताने रिस्ट स्पिन करणे मला स्वाभाविकपणे येते. ज्या दिवशी मी क्रिकेट खेळण्यासाठी चेंडू उचलला, तेव्हा पासून मी फक्त गोलंदाजीचा हा प्रकार करते. मी 2017 पासून हरियाणातील कुरुक्षेत्र येथे प्रशिक्षण घेत आहे. तिथे माझ्या प्रशिक्षकाने माझ्या गोलंदाजीवर खूप काम केले. माझे कौशल्य सुधारण्यासाठी मी अंडरहँड ड्रिल, फ्लिक्स इत्यादी आणि स्पॉट बॉलिंगसह अनेक गोष्टी सरावासाठी करते. रिस्ट स्पिन आणि बॉडी अलाइनमेंट बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मी कुलदीप यादव, ब्रॅड हॉग आणि शेन वॉर्न यांचे व्हिडिओ देखील पाहते.”
अमनदीपची WPL 2024 साठी मुंबई इंडियन्सने निवड केली आहे. लिलावाचा दिवस आठवून ती बोलते, “माझ्यासाठी हा खूप मोठा क्षण होता. निवड चाचण्यांमध्ये मी चांगली कामगिरी केली होती आणि टी-20 मध्ये सुद्धा चांगले प्रदर्शन केले होते. मला यावेळी अपेक्षा होती कि कुठलातरी संघ मला निवडेल. मी मुंबई इंडियन्सची खूप मोठी चाहती आहे आणि या संघाचा भाग होणे हे माझ्यासाठी खूप आनंददाई आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. मला हे जाणून घ्यायचे आहे की फलंदाज कसे विचार करतात आणि त्यांना बाद करण्यासाठी कसा डावपेच रचतात. मी हरियाणा क्रिकेट असोसिएशन आणि माझे प्रशिक्षक, अश्वनी सर आणि अनिरुद्ध सर यांचे सर्वांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानू इच्छिते.”
वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफीमध्ये आतापर्यंत, ओडिशाने चार सामन्यांत तीन विजय नोंदवले आहेत, तर हरियाणाने त्यांच्या चार सामन्यांत दोन.
दादोजी कोंडदेव स्टेडियमवर पुढील वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफी सामना शनिवारी गोवा आणि राजस्थान यांच्यात खेळवला जाईल.